मुंबई – काँग्रेस अल्पसंख्यक विभागाचे राष्ट्रीय सचिव फरहान आझमी यांची मुंबई अल्पसंख्य काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, पक्षभरात आणि अल्पसंख्य समाजात त्यांच्या निवडीचे स्वागत केले जात आहे.
फरहान आझमी यांचे काँग्रेस पक्षाशी दीर्घकाळाचे नाते आहे. त्यांनी अल्पसंख्याक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. तसेच, फरहान आझमी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य केले आहे. गरजूंसाठी मदत, शैक्षणिक उपक्रम, तसेच पक्षाच्या धोरणांची जनजागृती – या सर्व क्षेत्रांत त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नेतृत्वगुणांची, संघटनेतील सातत्यपूर्ण कार्यशैलीची आणि सर्व समाजवर्गांना एकत्रित घेऊन चालण्याच्या क्षमतेची दखल घेऊन ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या हाती सोपवली आहे.
अलीकडेच काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप मुंबईत समाजात तणाव निर्माण करत असल्याचा आरोप केला होता. अशा पार्श्वभूमीवर अल्पसंख्य समाजाशी जवळीक असलेले, समन्वय साधण्यात पटाईत आणि सर्वसमावेशक कार्यशैली असलेले फरहान आझमी यांची अध्यक्षपदी निवड काँग्रेससाठी निर्णायक ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबईतील अल्पसंख्य समाजाच्या अनेक प्रलंबित समस्यांचे निराकरण आता वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांपासून समाजातील विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








