वई येथील चंद्रभान शर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९ व २० डिसेंबर २०२५ रोजी ख्वाहिश २०२५ या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्वरूप असलेल्या या महोत्सवात महाराष्ट्रभरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होणार असून तरुणाईच्या उत्साहासोबत कला व प्रतिभेचे रंगतदार दर्शन घडणार आहे.
यंदा महोत्सवाची संकल्पना “ऐसा देश है मेरा”अशी असून भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे, परंपरेचे आणि एकतेचे दर्शन घडवण्यावर भर देण्यात आला आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात एकूण ३६ स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सादरीकरणे, कार्यशाळा आणि मनोरंजन यांचा समतोल संगम अनुभवता येणार आहे.
महोत्सवातील कार्यक्रम परफॉर्मिंग आर्ट्स, लिटरेरी आर्ट्स, फाइन आर्ट्स, गेम्स अॅण्ड स्पोर्ट्स, इन्फॉर्मल्स, स्टार इव्हेंट्स तसेच मीडिया इव्हेंट्स अशा विविध विभागांत आयोजित करण्यात आले आहेत. टीचर्स गॉट टॅलेंट, फॅशन शो, मिस्टर अॅण्ड मिस ख्वाहिश, वॉर ऑफ डीजे आणि डीजे नाईट यांसारखे लोकप्रिय कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहेत. यासोबतच फोटोग्राफी, रील मेकिंग आणि शॉर्ट फिल्म मेकिंगसारख्या मीडिया स्पर्धांमुळे सर्जनशीलतेला अधिक वाव मिळणार आहे.
या महोत्सवाला सुप्रसिद्ध गायिका डॉ. जसपिंदर नरुला या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून सुश्री प्रतीक्षा मिश्रा या विशेष अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. प्रसिद्ध कलाकार शहजाद अली यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढणार आहे.
ख्वाहिश २०२५ हा केवळ सांस्कृतिक महोत्सव न राहता विद्यार्थी, शिक्षक आणि कलाकार यांना एकत्र आणणारा प्रेरणादायी मंच ठरणार आहे. कला सादरीकरणाच्या माध्यमातून नातेसंबंध दृढ करणारा, अनुभवसमृद्ध आणि संस्मरणीय क्षण देणारा हा महोत्सव एकता, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक गौरवाचे प्रतीक ठरणार आहे.









