Dr Babasaheb Ambedkar Jaynti 2026 मालवणी परिसरात आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मालवणी पोलीस ठाणे येथे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला अंबुजवाडी जयंती उत्सव समिती, विविध बुद्धविहारांचे प्रतिनिधी तसेच मिरवणूक आयोजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे अध्यक्षस्थान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी भूषवले. त्यांच्या सोबत पोलीस निरीक्षक बिले आणि पोलीस निरीक्षक इंगवले यांनीही उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
बैठकीत मिरवणूक आणि जयंती कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेत आयोजकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. विशेषतः, मा. न्यायालयाच्या आदेशानुसार DJ लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात नियुक्ती करण्याचे आवाहन करण्यात आले.
वाहतुकीत अडथळा होऊ नये म्हणून मिरवणूक रस्त्याच्या डाव्या बाजूने काढण्याचे निर्देश देण्यात आले. यासोबतच, संशयास्पद हालचाली किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले की, मिरवणुकीत किंवा कार्यक्रमात कोणत्याही प्रकारच्या आक्षेपार्ह घोषणा, बॅनर किंवा धार्मिक-राजकीय घोषणाबाजी टाळावी. तसेच सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही आवर्जून सांगण्यात आले.
जयंती निमित्त लावण्यात येणाऱ्या झेंडे आणि बॅनरची जबाबदारी समितीवरच राहणार असून कार्यक्रम संपल्यानंतर ते तात्काळ काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. विविध मिरवणुका एकाच वेळी एकत्र येणार नाहीत यासाठी आयोजकांनी समन्वय साधावा, असेही सांगण्यात आले.
या बैठकीस सुमारे 20 ते 25 सदस्य उपस्थित होते. बैठक सायंकाळी 8:20 वाजता सुरू होऊन रात्री 9:25 वाजता शांततेत पार पडली.
शेवटी, मालवणी पोलिसांनी सर्व नागरिक आणि आयोजकांना शांतता, शिस्त आणि सहकार्याने आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे.









