वैद्यकीय क्षेत्रात चीनने एक धक्कादायक प्रयोग यशस्वी केल्याची माहिती समोर आली आहे.
चीनमधील संशोधकांनी हाडांसाठी विशेष बोन ग्लू तयार केलं असून त्याला लोक ‘फेविक्विक’ म्हणून संबोधत आहेत.
या ग्लूचा वापर केल्यास तुटलेली हाडे फक्त ३ मिनिटांत जोडली जाऊ शकतात, असे संशोधकांचा दावा आहे. पारंपरिक उपचार पद्धतीप्रमाणे दीर्घकाळ प्लॅस्टर चढवणं, शस्त्रक्रियेने रॉड बसवणं किंवा महिने महिने बेडरेस्ट घेणं याची आवश्यकता नसेल, असे सांगण्यात येत आहे.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या बोन ग्लूमध्ये विशेष प्रोटीन व रासायनिक घटकांचा समावेश आहे जे हाडांमध्ये जलद बंधन निर्माण करतात. हे बायो-कॉम्पॅटिबल असल्याने शरीराला अपायकारक न ठरता हाडांना नैसर्गिकरीत्या पुन्हा जोडण्यास मदत करतात.
तज्ज्ञ मात्र सावधगिरीचा सल्ला देत आहेत. अजूनही या बोन ग्लूवर मोठ्या प्रमाणात क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत. मानवी शरीरावर दीर्घकाळ वापरल्यास त्याचे काही दुष्परिणाम होतात का, याबाबत संशोधन चालू आहे.
या शोधामुळे भविष्यात फ्रॅक्चरच्या उपचारात मोठा बदल होऊ शकतो. विशेषतः अपघातग्रस्त रुग्ण, वृद्ध लोक आणि खेळाडूंना याचा सर्वाधिक फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.








