महाड राडा प्रकरणात अजूनही प्रमुख आरोपी फरार
महाड नगरपरिषद मतदानावेळी घडलेल्या महाड राडा प्रकरणात मोठी पोलिस कारवाई समोर आली असून, या प्रकरणातील आणखी तीन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल 25 दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आल्याने महाडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
महाड नगरपरिषद मतदानाच्या दिवशी विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थक गटांमध्ये तुफान हाणामारी झाली होती. या घटनेनंतर महाड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात मंत्री गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले तसेच माजी आमदार स्वर्गीय माणिक जगताप यांचे बंधू हनुमंत जगताप यांच्यासह 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्हे दाखल होऊनही सुरुवातीच्या काळात विकास गोगावले गटातील एकाही आरोपीला अटक न झाल्यामुळे विरोधकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन प्रमुख आरोपी विकास गोगावले याची माहिती देणाऱ्यास प्रथम 51 हजार व नंतर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
महाड राडा प्रकरणाची चर्चा लोकसभा आणि विधानसभेतही मोठ्या प्रमाणात गाजली होती. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी महाड शहर पोलीस आणि रायगड जिल्हा गुन्हे शाखेच्या विशेष पथकांना तैनात करण्यात आले होते.
दरम्यान, 2 डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीप्रकरणात विकास गोगावले गटातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मुंबई विमानतळावरून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ सापळा रचण्यात आला. या कारवाईत दोन आरोपींना मुंबई विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले, तर एका आरोपीला बिरवाडी परिसरातून अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
प्रतीक उर्फ विकी शिंदे, प्रतीक पवार आणि अमित कदम अशी आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मात्र, महाड राडा प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार असून, तो पोलिसांच्या जाळ्यात कधी सापडणार, असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड, रायगड…
M.R.P.: ₹1,599.00











