
अंबड ST बस स्थानक परिसरात एका तरुणावर भररस्त्यात मारहाण करत शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्यांचा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित तरुणाने पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड शहरातील रहिवासी 37 वर्षीय तरुण दि. 13 मे 2025 रोजी सायंकाळी अंदाजे आठ वाजता ST बस स्थानकाजवळील भागात आपल्या शासकीय कामासाठी जात होता. त्यावेळी अनंता बळवंत गायकवाड व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्याच्यावर अचानक हल्ला चढवला.
हल्लेखोरांनी पीडिताला विनाकारण अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. या गोंधळामुळे आसपासच्या नागरिकांनी हस्तक्षेप करत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी “तुला स्टेशनला पोचवतो आणि तुला जिवंत ठेवणार नाही,” अशा प्रकारच्या धमक्याही दिल्या.
ही घटना सार्वजनिक ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पीडित तरुणाने तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपी अनंता बळवंत गायकवाड व त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करीत आहे.