महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २२ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील डॉक्युमेंट्रीबाबत एक पोस्ट केली होती. माञ आता तीच पोस्ट त्यांनी डिलीट केली आहे. पोलिसांच्या विनंतीनंतर ही पोस्ट त्यांनी डिलीट केली आहे. मात्र, पोस्ट हटवतानाही त्यांनी आपला उद्देश साध्य झाल्याचे स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये “एकाधिकारशाही विरोधात ठिणगी टाकली, तिचा वणवा पेटलाय” असं म्हटलं होतं. आता ही पोस्ट डिलीट करताना त्यांनी “डॉक्युमेंट्री लोकांपर्यंत पोहोचावी हा उद्देश साध्य झालाय” असे नमूद केले आहे.
पोस्ट हटवत असल्याचे राज ठाकरे काय म्हणाले?
मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या विनंतीचा मान राखून आपण ही पोस्ट हटवत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, “जी आग लागायची ती लागली आहे, जानेवारी २०२६ मध्ये शिवतीर्थावरून पेटवलेला वणवा पुढेही कायम राहील,” असा इशारा देत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला आहे.
पोस्ट कशाबद्दल होती?
सबिर भाटिया यांनी तयार केलेली एक डॉक्युमेंट्री राज ठाकरे यांनी २२ ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरून शेअर केली होती. या डॉक्युमेंट्रीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांना दिलेल्या पाठींब्याबाबत आणि त्यातून झालेल्या राजकीय फायद्याबाबत भाष्य करण्यात आले होते. या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी डॉक्युमेंट्रीशी संबंधित अनेक सोशल मीडिया खात्यांना ती हटवण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. राज ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी शेअर केलेल्या डॉक्युमेंट्रीला ट्विटरवर ४८ लाखांहून अधिक तर फेसबुकवरही प्रचंड प्रतिसाद मिळाला.
देशाचे प्रबोधन हाच मूळ उद्देश
आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, “हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहोचावा आणि यातून देशाचे प्रबोधन व्हावे हाच माझा उद्देश होता, जो आता साध्य झाला आहे. जानेवारी २०२६ मध्ये मुंबईतील शिवतीर्थावर घेतलेल्या सभेतच मी याबाबत सविस्तर प्रेझेंटेशन केले होते. देश कसा एकाधिकारशाहीकडे चालला आहे हे मी त्यावेळीच दाखवून दिले होते.”
गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचा दोस्ताना कसा जुना आहे, आणि यातून अदानींच्या घशात भारतीय उद्योग विश्व कसं घातलं जात आहे याची पूर्ण माहिती देणारी सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री मी माझ्या सोशल मीडियावर शेअर केली. त्याला ४८ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज फक्त ट्विटरवर मिळाले, फेसबुकवर देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. हे झाले माझ्या सोशल मीडियावरचे व्ह्यूज, बाकी लोकांनी शेअर केलं ते वेगळं आणि त्यातून मिळालेले व्ह्यूज याची मोजदादच नाही.
थोडक्यात हा गंभीर विषय लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ही माझी इच्छा होती, तो हेतू साध्य झाला. अर्थात सबीर भाटियांनी ही डॉक्युमेंट्री आत्ता बनवली. पण त्याच्या आधीच जानेवारी २०२६ ला मुंबईतील शिवतिर्थ येथून मी एक मोठं प्रेझेंटेशन केलं होतं, ज्यात अदानीं समूह शब्दशः हा देश कसा गिळंकृत करायला निघाला आहे हे दाखवलं होतं.
त्याला अद्वितीय असा प्रतिसाद मिळाला. ते व्हिडीओज आजही माझ्या सोशल मीडियावर आहेत. आम्ही जे सादरीकरण केलं त्यातल्याच काही क्लिप्स या डॉक्युमेंट्रीत पण वापरल्या गेल्या. असो.या विषयाच्या बाबत मी माझी भूमिका या आधी अनेकदा स्पष्ट केली आहे. माझा व्यक्तीला विरोध नाही तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. मी माझ्या भाषणातून अनेकवेळा सांगितलं की पंतप्रधानांनी देशातील अनेक उद्योगपती मोठे करावेत आणि ज्यातून प्रचंड रोजगार या देशात निर्माण करावा आणि प्रचंड पैसा या देशात निर्माण व्हावा! तसेच या देशातील अनेक उद्योगपतींना जग पादाक्रांत करण्याची शक्ती द्यावी.
पण ते सोडून जर एकाचेच लाड करणार असाल आणि त्याने देशाला धोका निर्माण होणार असेल तर आमचा त्याला विरोध आहे आणि यापुढेही राहील. त्यामुळे अदानीच काय कोणाच्याही एकाधिकारशाहीला विरोध असणारच आहे.
आत्ता देखील आपल्या भीमाशंकर येथील काहीशे हेक्टर वनजमीन गुजरात मधल्या टोरेंट कंपनीच्या घशात घालायला राज्य सरकारला केंद्र सरकारने सांगितलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक वनजमिनी या सरकारने ठरावीक मित्र मंडळी उद्योगपतींच्या घशात घातल्या आहेत आणि अजुन घालायच्या ठरवल्या आहेत ! आज कोण कुठच्या पक्षात आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही, परंतु आपण या महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि आपल्या डोळ्यांदेखत महाराष्ट्र विकला जातोय हे बघताना तुमची तळपायाची आग मस्तकात कशी जात नाही याचंच मला आश्चर्य वाटतं ! महाराष्ट्रातल्या आपल्या मराठी खासदारांना , आमदारांना, मंत्र्यांना हे आपल्या डोळ्यांसमोर घडतंय याचा राग सुद्धा येत नाही ? सत्तेसमोर इतकं शरण जाणं हे महाराष्ट्राच्या इतिहासाला, परंपरेला आणि संस्कृतीला शोभणारे नाही. कशाला मग आपल्या शिवछत्रपतींच्या घोषणा देता आणि महाराष्ट्र गीत गाण्याचा फार्स करता ? असो..
पण सबीर भाटिया यांची डॉक्युमेंट्री शेअर केल्यावर तिला इतका प्रचंड प्रतिसाद आला की, वरच्यांच्या पोटात गोळा उत्पन्न होणे आणि आपलं गुपित फुटलं याची भीती निर्माण होणं हे स्वाभाविक होतं. पण ती इतकी तीव्र असावी की मला मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या मार्फत ही डॉक्युमेंट्री काढावी अशी विनंती केली गेली असावी.
मुळात मला जे म्हणायचं होतं ते जानेवारी २०२६ च्या सभेत आणि पुन्हा या डॉक्युमेंट्रीला पोस्ट करण्याच्या निमित्ताने केलं गेलं; यातून देशाचं प्रबोधन होणं हाच उद्देश होता आणि आहे ! पण मला आलेली विनंती ही मुंबई पोलीस आयुक्तांची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात कार्यक्षम पोलीस दल आहे आणि माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर राहिला आहे. अशा मुंबई पोलिसांच्या प्रमुखाने केलेल्या विनंतीचा मान राखतोय इतकंच.
म्हणून ही डॉक्युमेंट्रीची पोस्ट मी डिलीट करतोय. बाकी जी आग लागायची ती लागली आहे. जानेवारी २०२६ ला शिवतीर्थावरून मी या देशातील एकाधिकारशाहीच्या विरोधात ठिणगी टाकली तिचा वणवा पेटला आहे. आमचा लढा सुरु आहे. जानेवारी २०२६ ची आमची पोस्ट अजून तिथेच आहे आणि तिथेच राहील.आम्ही शेअर केलेली डॉक्युमेंट्री दुसऱ्यांनी बनवली होती ती पण लोकांपर्यंत पोहचावी हा उद्देश होता जो साध्य झाला. या विषयावर आम्ही केलेली अभ्यासपूर्ण मांडणी ही या निमित्ताने पुन्हा समोर आणतोय. आमच्या जानेवारी २०२६ च्या प्रेझेंटेशनचा भाग परत इथे देतोय. परत एकदा नक्की बघा..
— Raj Thackeray (@RajThackeray) October 25, 2026
चित्र बिकट होणार असेल, तर…
तसेच त्यांनी हे देखील स्पष्ट केलं होतं की, “माझा कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही, तर एकाधिकारशाहीला विरोध आहे. पंतप्रधानांनी देशातील सर्व उद्योगपतींना प्रोत्साहन देऊन रोजगार आणि संपत्ती निर्माण करावी. परंतु, जर केवळ एकाच उद्योगपतीचे लाड पुरवले जाणार असतील आणि त्यातून चित्र बिकट होणार असेल, तर आमचा त्याला विरोधच राहील.” अशापद्धतीने राज ठाकरे यांनी पुढेही याबाबत पोस्ट केली होती. पण नंतर पोलिसांच्यां विनंतीनंतर ती डिलीट केली.
मुंबई पोलिसांच्या विनंतीचा मान ठेवला
डॉक्युमेंट्री डिलीट करण्याच्या निर्णयाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “या डॉक्युमेंट्रीला मिळालेल्या प्रतिसादानंतर दिल्लीत भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांमार्फत मला ही पोस्ट काढण्याची विनंती करण्यात आली. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात सक्षम दल आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आहे. त्यामुळे पोलिसांच्या प्रमुखांनी केलेल्या विनंतीचा मान राखून मी ही पोस्ट डिलीट करत आहे. पण पोस्ट डिलीट केली तरी आमचा लढा सुरूच राहील. जानेवारी २०२६ मधील आमचे मूळ प्रेझेंटेशन आणि त्याचे व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत,” असेही त्यांनी शेवटी नमूद केले.








