बाप्पााच्या आगमनापूर्वी मुंबईसह राज्यात पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. एवढ्या दिवस दडी मारलेल्या पावसाची अखेर राज्यावर कृपा झालेली पाहायला मिळत आहे. 20 जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यासह खानदेश विदर्भातील अनेक जिल्हे आणि भागांना पावसाची मोठी आस आहे.
पावसाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण छत्तीसगडमार्ग हा कमी दाबाचा पट्टा विदर्भासह मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे. राज्यावर सध्या आभाळमाया आहे. नंदुरबार, धुळे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातहाी पाऊस सांगितला आहे. गेल्या 20-25 दिवसांपासून पावसाचा खंड पडला होता. पीकं धोक्यात आली होती. तर दुसरीकडे जलसाठेही प्रभावित झालेली पाहायला मिळत होती. शेतकरीही फार चिंतेतत होता. पण आता सुरु झालेल्या या पावसामुळे पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे.
20 जिल्ह्यांना मोठा अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात काही भागात ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. दमदार पाऊस पडेल. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भासह राज्यात दूरपर्यंत पाऊस धडकेल. नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबईसह इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. इतर भागात मेघगर्जनेसह धो धो पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप
मुंबई उपनगरात कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी परिसरात रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.अनेक भागात काल रात्रीपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत मान्सूनने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. गणरायाच्या आगमनापूर्वी वसई विरार मध्ये रात्रभर पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम सह अधूनमधून जोरदार पाऊस सलग सुरू आहे.
मुंबईतील पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला अडळथा
पण सलग पडणाऱ्या पावसाने काही सकल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. आभाळ पूर्ण भरून आले आहे. दिवसभर असाच पाऊस सुरू राहीलातर गणरायाच्या आगमनात विघ्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या सकाळ च्या वेळात शहरातील वाहतूक, आणि विरार वून चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल सुरळीत सुरू आहेत. पण मुंबईतील पावसामुळे गणेशोत्सवाच्या आगाऊ तयारीला माञ पावसाने अडथळा आणला आहे.
मुंबईकरांचे नियोजन बिघडवलं
बाप्पाच्या आगमनानिमित्त शहरात आणि उपनगरांमध्ये जोरदार तयारी सुरू असतानाच अचानक मुसळधार पावसाने मुंबईकरांचे नियोजन बिघडवले आहे. अनेक दिवसांच्या कोरड्या काळानंतर आलेल्या या दमदार पावसामुळे भक्तांना दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे मूर्ती आणणे, सजावट आणि खरेदीची लगबग, तर दुसरीकडे रस्त्यांवर साचलेले पाणी आणि वाहतुकीतील कोंडी.
रात्रीपासून मलबार हिल, गिरगाव परिसरात जोरदार पाऊस
रात्रीपासून मलबार हिल, गिरगाव त्यासोबतच संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. आज आणि उद्या अशाच पद्धतीने पावसाची संततधार सुरु राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढीत तीन ते चार तास मुंबईत मुळसधार पाऊस पडणार असा देखील अंदाज वर्तवला जात आहे. मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी पाणी देखील साचायला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. प्रशासन देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.
धुळ्यात जोरदार पावसाच्या सरी
धुळे शहरासह जिल्ह्यात तब्बल 43 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासून शहरात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे गणेशमूर्ती विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली, तर शेतीच्या दृष्टीने या पावसाने काही पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कपाशीच्या बोंडांवर रोग पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
नागपूर परिसरात पावसाची हजेरी
20 ते 22 दिवसांचा खंड पडल्यानंतर राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पावसाचं आगमन झाले. पावसामुळे खरीपातील काही पिकांना फायदा होण्याची शक्यता आहे. काल दुपारीही नागपुरात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या होत्या. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील दोन दिवस विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शहरात पावसाला सुरुवात झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. पाऊस समाधानकारक झाल्यास पिकांना काहीसा दिलासा मिळून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.








