अखेर काळजाचा तुकडा परत घेऊनच शांत झाली ही शाहूराजांची माती. असं म्हणायला हरकतं नाही. हा संदर्भ आहे नांदणी मठातल्या लाडक्या’माधुरी’ हत्तीणचा. वनताराने दिलेल्या माहितीनुसार, हाय-पॉवर्ड कमिटीच्या (HPC) निर्देशानंतर 30 जुलै 2025 रोजी माधुरीला जामनगरमधील राधे कृष्ण टेंपल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टमध्ये नेण्यात आलं होतं. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवलं होतं. या निर्णयामुळे तेव्हा फक्त नांदणी मठ नाही. तर अख्खं कोल्हापूर ढसाढसा रडलं होतं.
पण आता त्याचबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रात, विशेषतः कोल्हापुरात माधुरीच्या प्रकरणाने मोठं लक्ष वेधून घेतलं होतं. ती अनेक दशकांपासून नांदणी मठात राहत होती. तिच्या आरोग्याबरोबरच राहण्याच्या परिस्थितीवरही प्रश्न उपस्थित झाले होते. पशुकल्याण अधिकाऱ्यांकडून झालेली कारवाई आणि PETA India शी संबंधित कायदेशीर प्रक्रियेनंतर माधुरीला जामनगरला हलवण्यात आलं होतं. अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर माधुरीला जामनगरला हलवण्यात आलं होतं.
माधुरीला कोल्हापुरात परतण्याची अखेर परवानगी पण काही अटी लागू
यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व संबंधित पक्षांना HPC समोर आपापली बाजू मांडण्याचे निर्देश दिले. सर्व पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर, अहवालांचा आढावा घेत आणि नांदणी मठातील सुविधेची पाहणी केल्यानंतर HPC ने 9 सप्टेंबर 2026 रोजी माधुरीला कोल्हापुरात परतण्याची अखेर परवानगी देण्यात आली आहे. मात्र, माधुरीच्या सुरक्षेसाठी समितीने काही महत्त्वाच्या अटीही घातल्या आहेत. माधुरीचा मिरवणूक किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी वापर करता येणार नाही. तसेच तिची नियमित देखभाल करण्यासोबतच दर दोन आठवड्यांनी तिची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे. HPC चा हा निर्णय वंतारा स्वीकारत असून, माधुरीच्या पुनरागमनाशी संबंधित सर्व अटींचं पालन केलं जाईल, असं संघटनेने म्हटलं आहे.
माधुरीला उपचारांची गरज राहणार आहे
वनताराने हेही स्पष्ट केलं की माधुरीच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी तिच्या दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्याच्या समस्या पूर्णपणे दूर झाल्या आहेत, असं मानता येणार नाही. जामनगरमध्ये उपचारादरम्यान तिच्या अनेक जुन्या आरोग्य समस्या नियंत्रणात आणण्यात आल्या. मात्र, यापुढेही माधुरीला सातत्याने पशुवैद्यकीय देखरेख आणि आवश्यक उपचारांची गरज राहणार आहे.
वनताराचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ दर दोन आठवड्यांनी कोल्हापुरात जाऊन माधुरीची तपासणी करणार
माधुरी जामनगरमध्ये राहणार नसली तरी तिच्या आरोग्याची जबाबदारी वनतारा सोडणार नाही. माधुरीच्या कोल्हापूर वापसीपूर्वी नांदणी मठात योग्य निवारा, पशुवैद्यकीय सुविधा, वैद्यकीय उपकरणं, औषधं आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यासाठी वनताराने मदत केली आहे. HPC च्या निर्देशांनुसार वनताराचे पशुवैद्यकीय तज्ज्ञ दर दोन आठवड्यांनी कोल्हापुरात जाऊन माधुरीची तपासणी करतील. या तपासणीचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. उपचारात सातत्य राहावं आणि माधुरीच्या आरोग्यावर नियमित लक्ष ठेवता यावं, हा या व्यवस्थेमागचा उद्देश असल्याचं वनताराने सांगितलं
माधुरीच्या परतीपूर्वी नांदणी मठात सुविधांमध्ये सुधारणा
माधुरीच्या कोल्हापूर वापसीपूर्वी वनताराने नांदणी मठात काही कामं केली आहेत. सध्या शक्य तितक्या सुविधा सुधारण्यात आल्या आहेत. मात्र, टाउन प्लॅनिंगशी संबंधित काही मर्यादांमुळे पुढील बांधकामावर निर्बंध आहेत. ट्रस्टच्या जमिनीतून जाणाऱ्या रस्त्यामुळे विकासासाठी उपलब्ध जागाही मर्यादित असल्याचं वनताराने सांगितलं. माधुरी नवीन वातावरणाशी जुळवून घेतल्यानंतरही सुविधा आणखी सुधारण्यासाठी मदत सुरू ठेवण्याची तयारी वनताराने दर्शवली आहे. न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरणाकडून निर्देश मिळाल्यास अपग्रेडच्या कामातही सहकार्य केलं जाईल, असं संघटनेने स्पष्ट केलं.
View this post on Instagram
माधुरीसोबतचे वनताराचे मायेचं नातं
माधुरी जिथे राहते त्यापेक्षा तिचं आरोग्य, पशुवैद्यकीय उपचार आणि कल्याण यांना वनताराकडून अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं संघटनेने म्हटलं आहे. वास्तविक पशुकल्याणासाठी तथ्यांवर आधारित निर्णय, पशुवैद्यकीय विज्ञान, जबाबदार देखभाल, कायदेशीर प्रक्रियेचा आदर आणि प्राण्यांच्या जीवनाच्या सुरक्षेबाबत कायमची बांधिलकी आवश्यक असल्याचं वनताराने स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि HPC च्या निर्देशांबद्दल वनताराने आभार मानले आहेत.
“माधुरीचं आरोग्य आणि कल्याण ही वंताराची पहिली प्राथमिकता आहे. ती कुठे राहते यावर तिच्या आरोग्य, कल्याण आणि सन्मानाप्रती आमची बांधिलकी अवलंबून नाही. तिचं उत्तम आरोग्य राहावं आणि तिला दीर्घ, सुरक्षित आणि आनंदी आयुष्य लाभावं, हीच आमची इच्छा आहे,” असही वनताराने म्हटलं आहे.








