मुंबईतील अंधेरी पश्चिम, जुहू, विलेपार्ले पश्चिम आणि ओशिवरा यांसारख्या महत्त्वाच्या आणि उच्चभ्रू भागांचा समावेश असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या के/वेस्ट वॉर्डच्या कारभारावर एकामागून एक गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या म्हणजेच ACB कारवाया, ८७,३४७ संशयास्पद जन्मनोंदींचे प्रकरण, अनधिकृत बांधकामांचा सुटलेला प्रश्न आणि अंधेरीतील गोखले पुलाच्या बांधकामात कॅगने ओढलेले ताशेरे या सर्व घटनांमुळे पालिकेच्या अंतर्गत काहितरी घोटाळा असल्याचा संशय आहे.
गोखले पुलाच्या कामातील अनियमितता
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाचा काही भाग ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा ऐरणीवर आला. मात्र, CAG च्या ताज्या अहवालानुसार पालिकेच्या नियोजन आणि निविदा प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.जसं की,
विना-निविदा अतिरिक्त कामे: पुलाची स्थिती धोकादायक असतानाही तातडीने पारदर्शक निविदा न काढता, २५ एप्रिल २०१९ रोजी सुमारे ४.६६ कोटींचे अतिरिक्त काम विना-निविदा कंत्राटदाराला देण्यात आल्याचं समोर आलं आहे. यामुळे स्पर्धेअभावी कंत्राटदाराला अनुचित लाभ झाला आणि अखेरीस या कामासाठी ९.१९ कोटींचे पेमेंट करण्यात आलं आहे.
कामातील कमालीचा विलंब: संपूर्ण प्रकल्पाचे कंत्राट सुमारे ₹८७ कोटींचे असताना, ऑक्टोबर २०२२ पर्यंत ७५% काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात केवळ १५% काम पूर्ण झाले होते.
बर्फीवाला फ्लायओव्हर जोडणीचा गोंधळ: गोखले पूल आणि सी.डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या जोडणीत तब्बल २ मीटरचा आडवा व उभा गॅप राहिल्याने मोठा तांत्रिक अडथळा निर्माण झाला. त्यामुळे हा पूल २०२५ पर्यंत लांबला.
दंड आकारणीवर प्रश्न: सुरुवातीला कंत्राटदारावर केवळ ५,००० चा किरकोळ दंड ठोकण्यात आला होता. परंतु, माहिती अधिकारातून प्रकरण बाहेर आल्यानंतर पालिकेने ७.७८ कोटी रोखून धरत ३.५६ कोटींचा दंड प्रस्तावित केला.
भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोल?
के/वेस्ट वॉर्डातील विविध विभागांत ACB केलेल्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकामागून एक ACB च्या धाडी पडत असल्यामुळे भ्रष्टाचार कितपत रुजला आहे याची जाणीव होते.
वॉटर मीटर विभाग ,जुलै २०२६: वॉटर मीटर सुपरवायझर विनोद राठोड याला ४०,००० ची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात वॉटर मीटर इन्स्पेक्टर नंदन मोरे यांच्यावरही आरोप असून तक्रारदाराकडे १.२० लाखांची मागणी करण्यात आली होती.
अतिक्रमण आणि परवाना विभाग ,सप्टेंबर २०२६: एका बेकरी व्यावसायिकावर प्रशासकीय कारवाई न करण्यासाठी ६०,००० ची लाच स्वीकारताना ज्युनिअर इंजिनिअर निरवकुमार चुनिलाल जैसूर आणि कर्मचारी विजय रमेश पाटील यांना ACB ने अटक केली.
८७,३४७ संशयास्पद जन्मनोंदींचे रॅकेट
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील जन्म-मृत्यू नोंदणी व्यवस्थेत झालेला घोटाळा अधिकच गंभीर बनला आहे. सन २०२४ ते २०२६ या काळात केंद्र सरकारच्या अधिकृत ‘CRS’ प्रणालीऐवजी पालिकेच्या जुन्या ‘SAP’ प्रणालीचा गैरवापर करून तब्बल ८७,३४७ जन्म व दुरुस्ती नोंदी करण्यात आल्या. एवढंच नाही तर २०२४ मध्ये ३०,५०७, २०२५ मध्ये ४९,७०५ आणि २०२६ मध्ये ७,१३५ नोंदी झाल्याचे तपासात स्पष्ट झालं आहे.
SIT कडून चौकशी: विजिलन्स तपासात अनेक नोंदींची मूळ कागदपत्रे गहाळ असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने चौकशी सुरू केली असून K/West वॉर्डातील काही अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
चित्रकूट ग्राउंडवरील अनधिकृत बांधकामे
अंधेरीतील चित्रकूट ग्राउंड परिसरातील अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवर गॅरेज आणि मॅरेज हॉलसारखी अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती. महापालिकेने नुकतंच त्यावर हातोडा मारला असला, तरी “ही बांधकामे उभी राहत असताना संबंधित अधिकारी झोपले होते का?” असा सवाल स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.
प्रशासना समोर आता काही प्रश्न उपस्थित होत आहेत
जबाबदारी कोणाची? गोखले पुलाच्या प्रकरणात CAG ने ताशेरे ओढल्यानंतर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काय ठोस कारवाई झाली?
लाचखोरी रोखण्यात अपयश का? K/West वॉर्डात एकापाठोपाठ एक ACB कारवाया होत असताना पालिकेची अंतर्गत दक्षता यंत्रणा काय करत होती?
जन्मनोंदींचा नेमका आकडा किती? ८७,३४७ संशयास्पद जन्मनोंदींपैकी एकट्या K/West वॉर्डातील किती नोंदी आहेत आणि त्यातील बनावट प्रमाणपत्रे किती?
विलंब आणि दंडाबाबतही विचाराणा होत आहे. सुरुवातीला कंत्राटदाराला ५,००० रुपयांचाच दंड का करण्यात आला?
दरम्यान के/वेस्ट वॉर्ड हा मुंबईतील लाखो नागरिकांशी थेट जोडलेला अत्यंत संवेदनशील आणि मोठा नागरी विभाग आहे. त्यामुळे या प्रकरणी पालिका आयुक्त आणि राज्य सरकार केवळ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून थांबणार की मूळ पाळेमुळे खोदून काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








