मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही मंगळवारी, ८ सप्टेंबर रोजी रेल्वेने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात येत्या मंगळवारी तब्बल १२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
मंगळवारी तब्बल १२ तासांचा मेगा ब्लॉक
मंगळवारी तब्बल १२ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने याचा बऱ्यापैकी रेल्वे वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. हा मेगा ब्लॉक जळगाव – शिरसोली – म्हसावद या स्थानकांदरम्यानच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर घेतला जाणार आहे.ब्लॉकची वेळ मंगळवार,८ सप्टेंबर सकाळी ६:०० वाजल्यापासून ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत असणार आहे.
लोकल आणि मेमू गाड्या पूर्णपणे रद्द
रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी या मार्गावर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसवण्याचे काम केले जाणार आहे.या कामामुळे दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे नियंत्रित ठेवावी लागणार असल्याने महत्त्वाच्या लोकल आणि मेमू गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.ज्यामध्ये इगतपुरी – भुसावळ, भुसावळ – देवळाली, नाशिक रोड – बडनेरा मेमू या गाड्यांचा समावेश असणार आहे. या मार्गांवर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना आणि प्रवाशांना मंगळवारी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा उदा. एसटी किंवा खासगी बस वापर करावा लागणार आहे.
महत्त्वाच्या ट्रेन्सच्या वेळापत्रकात फेरबदल
रद्द झालेल्या गाड्यांव्यतिरिक्त इतरही काही महत्त्वाच्या ट्रेन्सच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यात आले आहेत.जसे की अंजनी–पुणे वंदे भारत एक्सप्रेस आणि भुसावळ–दादर एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांनी जुन्या वेळेवर अवलंबून न राहता सुधारित वेळापत्रक तपासूनच स्टेशनवर पोहोचावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
मेगा ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही
मेगा ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही होणार आहे. अमृत भारत एक्सप्रेससह अनेक महत्त्वाच्या गाड्या विविध स्थानकांवर सुमारे दोन ते तीन तास थांबवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासाला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः सकाळच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाडी रद्द झाली आहे का किंवा वेळेत बदल झाला आहे का, याची खात्री करूनच प्रवास करावा. असं आवाहन करण्यात आलं आहे.








