राज्यभरात मॉन्सूनचे प्रवाह मंदावले असल्यामुळे अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आज उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या पुढच्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार मात्र पावसाचे आगमन पुन्हा एकदा होणार आहे.
विश्रांतीनंतर मुंबईत पावसाची मुसळधार सुरुवात
मुंबईतही काही भागात काल ५ सप्टेंबरपासूनच पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने वातावरण थंडगार झालं आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला आहे.हवामान विभागाने मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यामुळे हवामान ढगाळ आणि दमट राहिलं, मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. मात्रा आता मुंबईत काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुढच्या आठवड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अचानक हवामान बदलल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अचानक हवामान बदलल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मुसळधार पावसाचा रस्ते, रेल्वे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात तुरळक सरी पडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
तीन सप्टेंबरपासून १० सप्टेंबरपर्यंतच्या आठवड्यामध्ये राज्यभरात पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी असेल. त्यानंतर विदर्भाला फायदा होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे विदर्भाला फायदा मिळू शकतो. त्या पुढच्या आठवड्यांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजाबद्दल खात्री कमी असली तरी नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाडा आणि कोकणाला फायदा होऊ शकेल.
‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
आज विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे, तसेच मराठवाड्यातील नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित संपूर्ण राज्यात मात्र ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील आणि ढगाळ वातावरणासह केवळ तुरळक ठिकाणीच हलक्या सरींची नोंद होईल.
तर या या राज्यांना जोरदार पावसाचा इशारा
आयएमडीने आज देशातील 17 राज्यांना महाअलर्ट जारी केला आहे. दिल्ली, यूपी, बिहार, हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, असाम, मेघालय आणि केरळमध्ये प्रचंड पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पूर्व भारतात विजांचा कडकडाट आणि वज्रपात होण्याचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.








