तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई सुरुच आहे.आता FDA नं थेट जुहू येथील प्रसिद्ध इस्कॉनच्या तीन आस्थापनांवर धाड टाकली असता तेथील अवस्था पाहून त्यांचे परवाने थेट निलंबित केले आहेत. तपासणीत त्रुटी आढळल्यानंतर एफडीएकडून ही कारवाई करण्यात आली. एफडीएने इस्कॉनच्या खाद्य आस्थापनांवर छापे टाकल्यानंतर, याठिकाणी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली.
इस्कॉनच्या खाद्य आस्थापनांमध्ये अस्वच्छता
राज्यात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित कारवाई करत आतापर्यंत मुंबईतील सहा, कोकण विभागातील तीन आणि पुणे विभागातील ११ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. इस्कॉनच्या खाद्य आस्थापनांमध्ये किटकांचा वावर, अन्नपदार्थांच्या साठवणुकीची अपुरी व्यवस्था, कच्चे व शिजवलेले अन्न वेगळे न ठेवणे, सांडपाण्यासाठी योग्य व्यवस्थेचा अभाव तसेच पाणी आणि अन्नपदार्थांची तपासणी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी यात त्रुटी आढळल्याचे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
कोणत्या रेस्टॉरंटवर कारवाई?
एफडीएने परवाने निलंबित केलेल्या इस्कॉनच्या तीन आस्थापनांमध्ये हरे कृष्णा लँड येथील मुख्य खाद्य आस्थापन, इस्कॉन जुहू फूड सर्व्हिसेस-रेस्तराँ आणि गोविंदाज रेस्तराँचा समावेश आहे. अधिकाऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी या आस्थापनांची तपासणी केली होती.
तपासणीत काय आढळलं?
हरे कृष्णा लँड येथील मुख्य खाद्य आस्थापनात कच्च्या मालाची व्यवस्थित तपासणी केली जात नसल्याचे आढळून आले. तसेच अन्नपदार्थांची अयोग्य पद्धतीने साठवण, किड्यांचा वावर, अपुरी स्वच्छता आणि खराब जलनिस्सारण व्यवस्था आढळली. पाण्याची तपासणी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, लसीकरण, प्रशिक्षण आणि ऑडिट यासंबंधीच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोविंदाज रेस्तराँमध्ये शीतगृहात पाणी साचलेले आढळले. नाले तुंबलेले होते. नियंत्रण व्यवस्थेत त्रुटी आढळल्या. तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ स्वतंत्रपणे ठेवले जात नसल्याचेही निदर्शनास आलं.
कारवाईनंतर इस्कॉनने दिली प्रतिक्रिया
जुहू येथील इस्कॉनचे उपाध्यक्ष गोकुळेश्वर दास यांनी या कारवाईबाबत एका वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली.त्यात ते म्हणाले की, ‘तीन तारखेला एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यानंतर पाठवलेल्या अहवालात ७० टक्के व्यवस्था योग्य असल्याचे नमूद करण्यात आले व ३० अद्याप सुधारणेची गरज असल्याचे सांगितले. सध्या रेस्तराँ बंद करण्यात आले असून, आम्ही सुधारणेसाठी प्रयत्न करतोय. सर्व पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा परवाना मिळवण्याचा प्रयत्न करु. एफडीएने दाखवून दिलेल्या त्रुटी सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. रेस्तराँ पुन्हा सुरु होईल त्यावेळी सर्वांना स्वच्छ आणि उत्तम प्रसाद मिळेल”, असे दास यांनी म्हटलं.
इतर ठिकाणी देखील कारवाई
अन्न सुरक्षा विभागाने मालाड पश्चिम येथील झेप्टोशी निगडीत आस्थापनाचा परवानाही निलंबित केला. तपासणीदरम्यान पॅक केलेल्या अंड्यांच्या बॉक्समध्ये आणि पेय ठेवण्याच्या टेबलवर जिवंत झुरळं आढळून आली. दूध, पनीर आणि दही १४ ते १५ अंश सेल्सिअस तापमानावर ठेवण्यात आले होते, तर अपेक्षित तापमान २ ते ६ अंश सेल्सिअस असणे आवश्यक आहे. शीतगृहाचे तापमानही २० ते २१ अंश सेल्सिअस असल्याचे आढळले. याशिवाय विक्रीसाठी ठेवलेल्या शेल्फवर मुदत संपलेले अन्नपदार्थही सापडले.
तपासणीत दुधाच्या लेबलिंगमध्ये विसंगती
खारघर येथील मातेश्वरी मिल्कवरही एफडीएने कारवाई केली. तपासणीत दुधाच्या लेबलिंगमध्ये विसंगती आढळल्या. टोंड दूध म्हणून विकले जाणारे सुटे दूध गायीचे दूध म्हणून, तर स्टँडर्डाइज्ड दूध म्हशीचे दूध म्हणून विकले जात असल्याचे आढळले. पाश्चरायझेशनची सुविधा उपलब्ध नसतानाही पाश्चराइज्ड दूध म्हणून दूध वितरित केले जात असल्याचेही तपासणीत समोर आले. कुर्ल्यातील आयआरसीटीशी संलग्न बेस किचनवरही एफडीएने कारवाई केली. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात झुरळं आढळली.








