
शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावरून वाद सुरुच असून शिवसेना ठाकरे गटाचं की शिवसेना शिंदे गटाचं या संदर्भात आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे वकील धृव मेहता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करत आहेत. या युक्तिवादावेळी धृव मेहता यांच्याकडून मोठा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुनावणीवेळी धृव मेहता यांच्याकडून 2019 च्या कर्नाटकातील सत्तास्थापनेचा दाखला देण्यात आला आहे. या प्रकरणात दहाव्या अनुसूचीनुसार कारवाई करता येणार नाही, शिंदेंच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही, टर्म संपेपर्यंत अपात्र करायचं की नाही याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे, असा दावा यावेळी धृव मेहता यांनी केला आहे.
निवडणुकीच्या आधी भाजप आणि शिवसेना पक्षाची युती होती
दरम्यान यावेळी युक्तिवाद करताना धृव मेहता यांनी भाजप आणि शिवसेना पक्षाच्या युतीचा देखील दाखला दिला आहे. निवडणुकीच्या आधी भाजप आणि शिवसेना पक्षाची युती होती, ही युती निवडणुकीनंतर तोडण्यात आली, हा मतदारांचा अपमान होता, यामुळे पक्ष कार्यकर्ते नाराज झाले असा युक्तिवाद देखील यावेळी धुव्र मेहता यांनी केला आहे. तसेच शिवसेना आणि भाजपची विचारधारा एक आहे. मात्र ज्या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे होते त्यांचे नेतृत्व शिवसेनाच करत होती. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि त्यामुळे सरकार कायम ठेवण्यासाठी शिंदे मुख्यमंत्री बनले असा दावा देखील यावेळी मेहता यांच्याकडून करण्यात आला आहे.
व्हीप बजावल्याच्या दाव्यावर आक्षेप
ध्रुव मेहता यांनी सांगितले की, अपात्रतेच्या नोटिसा शिवसेना विधिमंडळ कार्यालयाच्या अधिकृत लेटरहेडवर देण्यात आल्या होत्या. त्यावर सुनील प्रभू यांची स्वाक्षरी होती. मात्र, २१ जून रोजी दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाला व्हॉट्सॲपवर बैठकीचा संदेश पाठवण्यात आला. प्रत्यक्षात बैठक दुपारी १२ वाजता सुरू झाली होती.
हा संदेश म्हणजे सुनील प्रभू यांनी दिलेले बैठकीचे आवाहन होते. त्याला पक्षाचा अधिकृत व्हीप म्हणता येणार नाही. तसेच, या बैठकीसाठी कोणताही अजेंडा नव्हता आणि कथित आरोपांप्रमाणे कोणताही ठरावही मंजूर करण्यात आला नव्हता, असे मेहता यांनी स्पष्ट केले.
समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नातून बैठक होण्याची शक्यता
उलट, उलटतपासणीदरम्यान सुनील प्रभू यांनीच शिंदे गटाशी संपर्क होत नसल्यामुळे आणि त्यांच्याशी समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नातून बैठक बोलावल्याचे मान्य केल्याचा दावाही त्यांनी केला. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे. त्यांनी न्यायालयात ठाकरे गटाची बाजू मांडली.








