
तासंतास प्रवास करण्यापेक्षा आता अवघ्या एक तासात मुंबईहून सिंधुदुर्ग गाठता येणार आहे. कारण नवी मुंबई ते चिपी थेट विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 16 नोव्हेंबरपासून नवी विमानसेवा सुरू होणार आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्गातील चिपी विमानतळादरम्यान फ्लाय 91 कंपनीची थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. अवघ्या 1 तास 10 मिनिटांत हा प्रवास पूर्ण करता येणार असून आठवड्याचे सातही दिवस विमान उड्डाण करणार आहे.
रस्ते प्रवास आणि रेल्वेचे फुल्ल बुकिंग या कटकटीतून आता कोकणवासियांची व पर्यटकांची मोठी सुटका होणार आहे. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून बंद असलेली नवी मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) थेट विमानसेवा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. 16 नोव्हेंबर 2026 पासून नवी मुंबई विमानतळावरून चिपी विमानतळासाठी थेट विमान उड्डाण सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. या नव्या हवाई सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेश आणि सिंधुदुर्ग यांतील प्रवास अवघ्या 1 ते 1.15 तासांत पूर्ण होणार आहे.
आठवड्याचे 7 दिवस सेवा
‘फ्लाय 91’ या विमान कंपनीच्या माध्यमातून आठवड्याचे सातही दिवस ही नियमित विमानसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चिपी विमानतळाच्या या पुनरुज्जीवनामुळे सिंधुदुर्गच्या विकासाची नवी दारे खुली होतील, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या या सुंदर किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. प्रवासाचा वेळ वाचल्याने पर्यटकांचा ओघ वाढेल, ज्याचा थेट फायदा स्थानिक हॉटेल्स, होम-स्टे, वाहतूक व्यावसायिक, टूर गाईड्स आणि इतर लहान-मोठ्या व्यवसायांना होईल. तसेच स्थानिक तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होतील.
‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’चा मोठा निर्णय
तांत्रिक आणि काही इतर अडचणींमुळे चिपी विमानतळावरील हवाई सेवा यापूर्वी स्थगित करण्यात आली होती. मात्र, गेल्या 2 वर्षांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या विमानतळाच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विमानतळाकडे जाणारे रस्ते, अखंडित वीजपुरवठा आणि रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याच्या सुविधांशी संबंधित सर्व तांत्रिक समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले आहेत.
इतकेच नव्हे तर, ही हवाई सेवा दीर्घकाळ अखंडित सुरू राहावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाने ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ देण्याचा ऐतिहासिक निर्णयही घेतला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून 16 नोव्हेंबर रोजी पहिले विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती दिली आहे.
चला, १६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्गच्या विकासाचा टेकऑफ घेऊया!
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासात आज आणखी एक महत्त्वाचा आणि अभिमानास्पद अध्याय जोडला जात आहे.
१९९९ साली तत्कालीन मुख्यमंत्री तथा खासदार मा. नारायणराव राणे साहेबांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषणा केली. त्याच विकासदृष्टीतून चिपी येथे विमानतळाची उभारणी करण्यात आली.
येत्या सोमवार, दिनांक १६ नोव्हेंबरपासून नियमितपणे सुरू होणारी Fly91 ची विमानसेवा कोकणच्या विकासाला नवी भरारी देणारी ठरणार आहे. सिंधुदुर्गच्या विकासाची स्वप्ने पाहणाऱ्या प्रत्येकासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे!
ही विमानसेवा दररोज सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्राताई पवार, संबंधित अधिकारी आणि महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार!
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @MeNarayanRane @RaviDadaChavan @BJP4Maharashtra @samant_uday @dvkesarkar @meNeeleshNRane @Deepakk75058621
#सिंधुदुर्ग #चिपीविमानतळ #विमानसेवा #येवाकोकणआपलोचआसा #Sindhudurg #KonkanDevelopment #ChipIAirport #AirConnectivity #NewMumbaiAirport
— Nitesh Rane (@NiteshNRane) November 14, 2026
नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवेचे अचूक वेळापत्रक
नवी मुंबई ते चिपी: सकाळी 7:55 वाजता नवी मुंबई विमानतळावरून विमान उड्डाण करेल आणि सकाळी 9:05 वाजता सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पोहोचेल.
चिपी ते नवी मुंबई: परतीच्या प्रवासात सकाळी 9:25 वाजता चिपी विमानतळावरून विमान उड्डाण घेईल आणि सकाळी 10:35 वाजता नवी मुंबई विमानतळावर दाखल होईल.
पनवेलहून लोकल न बदलता थेट गाठता येणार वसई! असा असेल 69 किमीचा नवा रेल्वेमार्ग
किती असतील तिकिटांचे दर?
या बहुप्रतिक्षित विमानसेवेचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले असून, मंत्री नितेश राणे यांनी या बुकिंगचा एक स्क्रीनशॉट देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई ते सिंधुदुर्ग या प्रवासासाठी तिकीट दर 3500 रुपयांपासून ते 12000 रुपयांपर्यंत ठेवण्यात आले आहेत.








