
बोरिवलीहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका तरुणीसोबत छेडछाड केल्याची आणि विरोध केल्याने तिला लोकल दरम्यान थेट रेल्वे रुळांवर ढकलून दिल्याची अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. ४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेत तरुणीचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली आल्याने कोपरापासून कापावा लागला. तर डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीने तिच्या छातीजवळ हात लावून गैरवर्तन केलं
पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, लोकल नायगाव स्थानकात आल्यानंतर आरोपीने तिच्या छातीजवळ हात लावून गैरवर्तन केले. याला विरोध करत तरुणीने आरोपीला चप्पल मारली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. लोकल फलाटावर थांबलेली असताना आरोपीने तरुणीला दोन्ही हातांनी जोरात धक्का दिला. त्यामुळे ती दोन डब्यांच्या मधून रेल्वे रुळांवर पडली. फलाटावर येण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाल्याने तिचा डावा हात चाकाखाली आला.
‘मला फक्त न्याय हवाय…’, तरुणीने सांगितला सर्व घटनाक्रम
दरम्यान या घटनेबाबत पिडीत तरूणीने माहिती देताना सांगितले की, “मी नायगावला जात होते. मी बोरिवलीहून ट्रेन पकडली होती. नायगाव स्टेशन येणार होते, तेव्हा ते अंकल मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श (बॅड टच) करत होते. त्यामुळे माझे त्यांच्याशी भांडण झाले. त्यानंतर मी ट्रेनमधून खाली उतरले, तरीही ते मला सतत बॅड टच करत होते. त्यावर मी त्यांना म्हणाले की, ‘तुमच्या घरात आई-बहीण नाही का?’ तरीही ते मला बॅड टच करतच राहिले. त्यानंतर मी त्यांना शिवी दिली, तर त्यांनीही मला उलट शिवीगाळ केली. मग त्यांना दूर करण्यासाठी मी त्यांना चप्पल मारली, तर त्यांनीही मला चप्पल मारली आणि थेट मला खाली ढकलून दिले. मला न्याय हवा आहे. माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या घरात सर्व काही सांभाळणारी मी एकटीच होते. मला फक्त न्याय हवा आहे, मला न्याय मिळालाच पाहिजे. माझा एक हात पूर्णपणे निकामी झाला आहे. आता या एका हाताने मी काहीच करू शकत नाही. मला आता फक्त न्याय हवा आहे. माझ्या डोक्यालाही गंभीर मार लागला असून, डोक्याला 16 टाके पडले आहेत. मला फक्त न्याय हवा आहे. मी लवकर बरी व्हावी यासाठी सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा आणि त्या नराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे.” असं म्हणत तरुणीने राग व्यक्त केला आहे.
आरोपीला अटक करण्यात आली आहे
घटनेनंतर आरोपी गर्दीचा फायदा घेऊन फरार झाला होता. माञ आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. भाईंदर रेल्वे पोलीस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला भारतीय न्याय संहिता कलम ७४, ११७(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. मात्र, खुनाच्या प्रयत्नाचे कलम १०९ न लावल्याबद्दल कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. मनसे पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आवश्यक कलमे वाढवण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.








