अधारिका फाउंडेशनतर्फे कांदिवली येथे आयोजित विशेष फँसी ड्रेस गरबा कार्यक्रमाच्या वेळी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ दृष्टिहीन महिलांचा ‘नवदुर्गा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.या सोहळ्याने दृष्टिहीन महिलांचे धैर्य, कर्तृत्व, नेतृत्व आणि समाजासाठी केलेले योगदान अधोरेखित केले.
महिलांनी आपल्या जिद्दीने समाजासमोर नवी प्रेरणा ठेवली
पुरस्कार प्राप्त करणाऱ्या मान्यवरांमध्ये तृप्ती सुनील वजरानी, नेहा नलीन पावसकर, पायल श्रीगोपाल भट्टाड, कोमल पाटील, परिमळा विष्णू भट, सिद्धी तोरस्कर, डॉ.उर्वी जंगम, रुजूल गोयथळे आणि उम्मेहानी बागसरावाला यांचा समावेश होता. शिक्षण, क्रीडा, कला, संशोधन, समाजसेवा, रोजगार आणि दृष्टिहीन व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या या महिलांनी आपल्या जिद्दीने समाजासमोर नवी प्रेरणा ठेवली आहे.
तृप्ती वजरानी यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ व गोलबॉल स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, तर नेहा पावसकर यांनी क्षितिधर शिखर सर करून विश्वविक्रम नोंदवले आहेत. पायल भट्टाड या पीएच.डी. संशोधक असून बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. कोमल पाटील यांनी मल्लखांब व टँडम सायकलिंगमध्ये आपली खास कामगिरी केली आहे.
भारतातील पहिल्या अंध महिला म्हणून इतिहास घडवला
परिमळा भट यांनी दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ‘स्नेहांकित हेल्पलाइन’ ची स्थापना केली आहे. सिद्धी तोरस्कर नृत्य व नाट्यकलेतून विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी कार्य करतात, तर डॉ. उर्वी जंगम यांनी जर्मन स्टडीजमध्ये पीएच.डी. मिळवणाऱ्या भारतातील पहिल्या अंध महिला म्हणून इतिहास घडवला आहे. विद्यार्थिनी रुजूल गोयथळे यांनी दहावीत ९०.४०% गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे, तर उम्मेहानी बागसरावाला यांच्या ‘Pearls of Vision’ उपक्रमामुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी मिळत आहेत.
आत्मविश्वास अभिफँसी ड्रेस गरबा कार्यक्रमातही सहभागींनी उत्साहाने भाग घेतलामानाने सादर केला
या प्रसंगी अधारिका फाउंडेशनने दृष्टिहीन मित्र-मैत्रिणींसाठी आयोजित केलेल्या फँसी ड्रेस गरबा कार्यक्रमातही सहभागींनी उत्साहाने भाग घेतला. संगीत, नृत्य आणि फँसी ड्रेसच्या माध्यमातून सहभागींनी आपली कला व आत्मविश्वास अभिमानाने सादर केला. हा उपक्रम केवळ नवरात्रोत्सव नव्हे, तर समावेशकता, आनंद आणि आत्मनिर्भरतेचा उत्सव होता.
‘नवदुर्गा पुरस्कार’ हे केवळ सन्मान नव्हे’
अधारिका फाउंडेशनचा उद्देश दृष्टिहीन व्यक्तींना शिक्षण, कौशल्य, रोजगार आणि सन्मानाच्या जीवनाकडे जोडणे हा आहे. फाउंडेशनने दृष्टिहीन व्यक्तींसाठी टेलिकॉलिंग प्रकल्पाद्वारे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचाही महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे. ‘नवदुर्गा पुरस्कार’ हे केवळ सन्मान नव्हे, तर दृष्टिहीन महिलांच्या क्षमतेची, स्वावलंबनाची आणि समाजातील समान संधींची घोषणा आहेत. अधारिका फाउंडेशनच्या वतीने सर्व पुरस्कारविजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.










