गोकुळ दूध संघाची कोरमअभावी तहकूब झालेली अध्यक्षपदाच्या निवडसभेची कोंडी पंधरा दिवसांनी फुटली. महायुतीने अखेर अध्यक्षपदावर दावा सांगून, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली आज (10 नोव्हेंबर) सभा पार पडली. यामध्ये गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर, तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यात लढत झाली. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या या लढतीत राजेश पाटील यांचा विजय झाला. गोकुळच्या निवडून आलेल्या 25 संचालकांनी आणि शासननियुक्त 4 संचालकांनी या मतदानप्रक्रियेत भाग घेतला.
महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून माजी आमदार राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. महायुतीच्या नेत्यांची झालेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
अखेर आता गोकुळच्या अध्यक्षपदासाठी राजेश पाटील विजयी ठरले आहेत.
महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या
गोकुळ दूध महासंघासाठी 18 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. तर 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर झाला होता. यामध्ये एकूण 25 जागांपैकी सतेज पाटलांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला 13 जागा, तर महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीला 12 जागा मिळाल्या होत्या. याच समविचारी आघाडीच्या 13 आणि महायुतीच्या 12 संचालकांनी मतदान केले. तसेच शासन नियुक्त चार सदस्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यानंतर राजेश पाटील यांचा विजय झाला. मात्र अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक कोरम दोन्ही पक्षांकडे नाही. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर 5 शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यासह त्यापैकी चार जणांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय महायुतीनं घेतला.
आज गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली
महायुतीचा शासननियुक्त संचालकांच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी कोर्टाचे दार ठोठावले. परंतु 10 नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधिन ठेवून घेण्यास सांगितले. त्यानंतर आज गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा विजय झाला.
राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. 2024 च्या निवडणुकीत भाजप बंडखोर शिवाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला. यापूर्वी त्यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे सुद्धा आमदार होते.








