मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असतानाही सर्रासपणे फोडले जात आहे. ८ नोव्हेंबरपासून मुंबईत तर आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.राज्यासह मुंबई आगीच्या दुर्घटना सुरूच आहे. मुंबईत काल रात्री म्हणजे ९ नोव्हेंबर २०२६ रोजी ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. फटाक्यांमुळे कुठे घर, तर कुठे दुकानांना आग लागल्याची घटना घडली. अशाच एका घटनेत एका सोळा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मुलाच्या मृत्यूने दिवाळीला गालबोट लागलं. 16 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने मालाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मालाडमध्ये 16 वर्षांच्या मुलाच्या मृत्यू
मुंबईच्या मालाड पश्चिम येथे भीषण आग लागून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मालाडच्या मालवणी परिसरात ही घटना घडली. मालवणीमधील गेट नंबर 8, अब्दुल हमीद मार्ग परिसरात ही घटना घडली. या परिसरातील तळमजल्यावरील एका दुकानाला आग लागली होती. ही आग सुमारे २० बाय ३० फुटाच्या परिसरात पसरली. त्याचवेळी झालेल्या फटाक्यांच्या स्फोटामुळे दुकानाचा स्लॅब कोसळला. या घटनेत एक मुलगा बेपत्ता झाला होता. बेपत्ता असलेला मुलगा नंतर दुकानात मृतावस्थेत आढळला. त्याचे शरीर पूर्णपणे जळाले होते. त्याला खासगी रुग्णवाहिकेतून बीएमसीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. शनवाज नियाज खान असे मृत मुलाचे नाव आहे.
मुंबईत 5 ठिकाणी आग
मुंबईत सोमवारी रात्री पाच ठिकाणी आग लागण्याची घटना घडली. मालवणीनंतर दहीसरमध्ये आग लागण्याची घटना घडली. दहीसरच्या कांदरपाडा परिसरात रात्री आग लागल्याची घटना घडली. आरबीआय कॉलनीमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर प्रसिद्ध गुंदेचा शाळेच्या जवळ ही आग भडकली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने पोहोचल्या. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.
धारावीत, अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरातही अग्नीतांडव
धारावीत एका इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने वेळेवरून पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. धारावीनंतर चुनाभट्टी विभागात रात्री 2.40 वाजताच्या सुमारास साईनाथ सेवा मंडळाच्या व्यायाम शाळेचे प्लास्टिकचे शेड अचानक पेटल्याने आग लागली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, चुनाभट्टी पोलिसांसहित मंगलमूर्ती कॅटर्सच्या कर्मचाऱ्यांनी जिवाचं रान करून आग विझविली. अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरातील एका इमारतीत रात्री आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाने वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवलं. मालवणीच्या घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यूची घटना सोडली, तर इतर ठिकाणी लागलेल्या आगीत सुदैवाने कुणीही जखमी झालेल्याची माहिती अद्याप नाही .
एवढंच नाही तर रविवारी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील एका बहुमजली इमारतीला रविवारी रात्री आग लागली. ही आग भीषण होती. नवव्या मजल्यावर लागलेली ही आग काही क्षणांमध्ये 17 व्या मजल्यापर्यंत पसरत गेली. त्यामुळे या इमारतीमधील अनेक रहिवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या वेगवान हालचालींमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे ८ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर अग्ना तांडवांनी मुंबई अक्षरश: हादरून गेली.








