कोल्हापूरच्या बहुचर्चित ‘गोकुळ’ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेत भारतीय जनता पक्षावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. सत्तेत असूनही लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली मोर्चे काढणाऱ्या भाजपचा खरपूस समाचार घेतला. “महाराष्ट्रात पाण्याचा आणि भाजपमध्ये समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा पाहायला मिळावा, याचेच आश्चर्य वाटते,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी टोला लगावला आहे.
सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप
गोकुळ दूध संघात भाजपला सत्ता मिळवता आली नाही, म्हणून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून त्यांनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली आहे जी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. राज ठाकरेंनी नेमकं त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हटलं जाणून घेऊयात.
भारतीय जनता पक्ष हा एक असा अजब पक्ष
“भारतीय जनता पक्ष हा एक असा अजब पक्ष आहे, जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे; तरीही यांच्याकडून ‘लोकशाही वाचवा’ म्हणून मोर्चे काढले जातात. जर लोकशाहीची खरोखरच बूज राखायची असेल, तर गोकुळच्या निवडणुकीत भाजप पॅनलचे १२ तर सतेज पाटील पॅनलचे १३ जण निवडून आले होते. मग असे असताना लगेचच सरकारचे ५ संचालक कसे नेमण्यात आले? भाजपने असा प्रताप का केला? आणि जनतेला मतदानाचा अधिकार देऊन नक्की काय सिद्ध करायचंय?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.
https://www.facebook.com/share/1EFrkJq15L/
भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ
त्यापुढे त्यांनी असे म्हटले की, “ही निवडणूक बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने लढवून निवडून आले. जर भाजपला लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार केला नसता. गोकुळवर सत्ता मिळवता नाही आली म्हणून सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार, असा घणाघात भाजपवर केला. तसेच सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं” असं म्हणत त्यांनी निवडणुकीत लोकशाही मार्गाने पराभव झाल्यानंतरही सत्तेचा वापर करून ताबा मिळवण्याच्या प्रयत्नांवर राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला.
‘रडीचा डाव खेळणं बंद करा’ : राज ठाकरे
पुढे राज ठाकरेंनी म्हटंल की, “सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील. भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी १२ वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे”.असा परखड सल्लाही राज ठाकरेंनी दिला आहे.
दरम्यान कोल्हापूरच्या गोकुळवरून पेटलेले हे राजकारण आता राज ठाकरेंच्या या एंट्रीमुळे आणखी पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.








