आंबेडकरी विचारांची घट्ट बांधिलकी, अन्यायाविरुद्ध सातत्याने पुकारलेला पुकारा, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठीचा अखंड लढा आणि सामाजिक, राजकीय व संघटनात्मक क्षेत्रात प्रदीर्घ काळ गाजवलेले कर्तृत्व—अशा संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचे धनी असणारे आनंद (दादा) निकाळजे यांचे १ नोव्हेंबर २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळ, कामगार संघटन आणि सामाजिक क्षेत्रातील एका निष्ठावान शिलेदाराला आपण मुकलो आहोत. आणीबाणीच्या काळातील अंधारापासून ते झोपडपट्टीवासीयांचे हक्क, मराठी भाषेचा स्वाभिमान, बौद्ध समाजाचा विकास आणि असंघटित कामगारांचा संघर्ष अशा विविध आघाड्यांवर त्यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे.
लढवय्या नेत्याला अधिक परिपक्व केलं
दादांच्या सार्वजनिक जीवनाचा पायाच संघर्षावर रचलेला होता. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या कालावधीत देशात लागू झालेल्या आणीबाणीच्या काळात त्यांनी एका जुझारू आंदोलकाची भूमिका बजावली. लोकशाही अधिकार, नागरिकांचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी पुकारलेल्या या लढ्यात त्यांना तब्बल १९ महिने तुरुंगवास सोसावा लागला. तुरुंगवासाच्या या खडतर अनुभवाने त्यांच्यातील विद्रोही आणि लढवय्या नेत्याला अधिक परिपक्व केले.
मराठी भाषेचा लढा आणि मंत्रालयात दिलेला जाब
१९७० च्या दशकात तत्कालीन शिक्षणमंत्री एम. डी. चौधरी यांच्या काळात शाळांमध्ये मराठी माध्यमाला प्राधान्य मिळावे आणि इंग्रजीच्या सक्तीबाबतचा वाद ऐरणीवर आला होता. अशा वेळी मातृभाषेचा हक्क आणि प्रादेशिक अस्मितेसाठी दादांनी थेट मंत्रालयात धडक मारली. शिक्षणमंत्र्यांच्या कक्षात जाऊन जाब विचारण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सत्तेच्या दालनात धाडसाने मांडण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले.
झोपडपट्टीवासीयांचे संघटन आणि जनहितार्थ लढा
मुंबईतील झोपडपट्टीवासीयांच्या समस्या, निवारा आणि मूलभूत हक्कांसाठी त्यांनी मोठे कार्य केले. स्वातंत्र्यसैनिक वामनराव परब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या ‘झोपडपट्टी जनता परिषदे’च्या माध्यमातून त्यांनी मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभी राहिली. अन्यायाविरुद्ध थेट भूमिका घेणे आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे हा त्यांच्या कार्यशैलीचा स्थायीभाव होता. १९८१ मधील गाजलेल्या सिमेंट घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला घेराव घालण्याच्या आंदोलनात त्यांची आक्रमक भूमिका आणि लोकजीवनाचे उत्तरदायित्व अधोरेखित करणारी ठरली.
ग्रामीण लघुउद्योजकांसाठी ‘आनंद मेळावे’ आणि सामाजिक विकास
केवळ राजकीय संघर्षच नव्हे, तर रचनात्मक कार्यातही दादा अग्रेसर होते. बौद्ध समाजाला सहकार क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी ‘बौद्ध विकास परिषदे’ची स्थापना केली. तसेच, १९८७ ते १९९९ या काळात आदिवासी व ग्रामीण भागातील हस्तकला, कलाकृती आणि लघुउद्योजकांना मुंबईसारख्या शहरांत हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘आनंद मेळावे’ आयोजित केले. ग्रामीण कलाकार आणि शहरी ग्राहक यांच्यात थेट सेतू निर्माण करून रोजगार निर्मितीचा पायंडा त्यांनी पाडला.
‘समाज समता कामगार संघा’ची स्थापना
२००७ पासून निवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये यांच्या समवेत त्यांनी ‘समाज समता संघा’च्या कार्याचा महाराष्ट्रात विस्तार केला. याच प्रेरणेतून असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या शोषणविरोधात आवाज उठवण्यासाठी ‘समाज समता कामगार संघा’ची स्थापना करण्यात आली, ज्याचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. कंत्राटी कामगारांचे प्रश्न, कामाच्या अटी आणि सामाजिक सुरक्षेसाठी त्यांनी विविध लढे उभारले.
आरोग्य सेविका आणि आशा वर्कर्सना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
दादांच्या निस्सीम समाजकार्याची साक्ष देणारा एक प्रसंग म्हणजे कोविड महामारीचा काळ. स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही त्यांनी ‘भाकर फाउंडेशन’च्या माध्यमातून वरळी परिसरातील १५० हून अधिक आरोग्य सेविका आणि आशा वर्कर्सना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. संकटकाळात शेवटच्या घटकाच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची ही वृत्ती त्यांच्यातील संवेदनशील मनाची साक्ष देणारी होती.









