तरुण पिढीमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि स्वसंरक्षणाची भावना निर्माण करणाऱ्या तायक्वांदो खेळाबाबत मुंबईत एक अत्यंत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कोरियन कॉम्बॅट मार्शल आर्ट ट्रस्टच्या वतीने अंधेरी पश्चिमेकडील श्री हर्षद वालिया इंटरनॅशनल कॉलेजमध्ये भव्य ‘आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा’ पार पडली. या स्पर्धेत चिमुरड्यांपासून ते मोठ्यांपर्यंत शेकडो खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचे जोरदार प्रदर्शन केलं.
स्पर्धेत विविध तायक्वांदो क्लबमधील बालक-बालिका तसेच पुरुष व महिला खेळाडूंचा उत्साहात सहभाग
अंधेरी पश्चिमेतील श्री हर्षद वालिया इंटरनॅशनल कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेचे आयोजन ग्रँडमास्टर परवेझ खान यांनी केले होते. या स्पर्धेत विविध तायक्वांदो क्लबमधील बालक-बालिका तसेच पुरुष व महिला खेळाडूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्पीड किक, पुमसे आणि स्पॅरिंग या अत्यंत चुरशीच्या प्रकारांमध्ये खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट क्रीडाप्रतिभेचे आणि कौशल्याचे शानदार प्रदर्शन केलं.
विजयी खेळाडूंना पदके व सन्मानचिन्हे प्रदान
या भव्य सोहळ्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री. प्रसाद आयरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि विशेष अतिथी वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन थाते व श्रीमती हजरा रियाज शाह (एनजीओ पार्टनर, एच.आर.एच. फाउंडेशन) यांच्या उपस्थितीत विजयी खेळाडूंना पदके व सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली.
आठ प्रतिभावान खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करून गौरवण्यात आल
यावेळी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे कुक्कीवॉन या नामांकित आंतरराष्ट्रीय तायक्वांदो संस्थेची ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्रे, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अहाना चौधरी, अर्जुन दक्ष देसाई, अमान अली कुरेशी, अशर सय्यद, अलीजा सय्यद, आर्यमन जैन यांच्यासह ऋषभ रजनीश जैन (द्वितीय डॅन) आणि विवेक परशुराम पवनांकर (तृतीय डॅन) या आठ प्रतिभावान खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करून गौरवण्यात आलं आहे.
उल्लेखनीय यशाचे कौतुक
खेळाडूंमधील जिद्द आणि त्यांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करून मान्यवरांनी त्यांना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. तायक्वांदोसारख्या मार्शल आर्ट्स स्पर्धांमुळे तरुण पिढीमध्ये शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्ती रुजण्यास मोठी मदत होते, असा सूर यावेळी उमटला.
ग्रँडमास्टर परवेझ खान यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत शेकडो खेळाडूंनी सहभाग घेतला
कोरियन कॉम्बॅट मार्शल आर्ट ट्रस्टच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील श्री हर्षद वालिया इंटरनॅशनल कॉलेजमध्ये भव्य आंतरक्लब तायक्वांदो स्पर्धा पार पडली. ग्रँडमास्टर परवेझ खान यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत शेकडो खेळाडूंनी सहभाग घेतला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री. प्रसाद आयरे, वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नितीन थाते आणि एच.आर.एच. फाउंडेशनच्या सौ. हजरा रियाज शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गुणवंत खेळाडूंना पदके आणि आंतरराष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.








