आयआयटी मुंबई येथील अनुसूचित जातीतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संस्थात्मक हत्येच्या प्रकरणात दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज आमदार असलम शेख, खासदार प्रा.वर्षाताई गायकवाड आणि आमदार अमीन पटेल यांनी साहिलच्या वडिलांसोबत मुंबई पोलिसांचे जॉइंट सीपी (क्राईम) श्री. अनिल कुंभारे यांची भेट घेतली.
कुटुंबाच्या वेदनेला न्याय मिळवून देण्यासाठीचा आमचा संघर्ष थांबणार नाही
या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासाचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रकरणातील संथ गतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. “एका आई-वडिलांचा तरुण मुलगा हिरावला जाण्याचं दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही. परंतु, त्या कुटुंबाच्या वेदनेला न्याय मिळवून देण्यासाठीचा आमचा संघर्ष थांबणार नाही. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि कायद्यापुढे कोणीही मोठा नाही, हे सिद्ध झाले पाहिजे. आजचा आमचा हा आवाज केवळ साहिलसाठी नाही, तर देशातील प्रत्येक त्या विद्यार्थ्यासाठी आहे, ज्याला सुरक्षितता, सन्मान आणि समानतेने जगण्याचा घटनात्मक अधिकार आहे. साहिलला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, अन्यायाविरुद्धचा हा लढा शेवटपर्यंत सुरूच राहील!” असंही असलम शेख यांनी म्हटलं आहे.
आरोपींना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही,
साहिलच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांच्या तक्रारीवरून अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. असे असूनही संबंधित आरोपींना अद्याप अटक का करण्यात आलेली नाही, असा थेट प्रश्न शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाला विचारला.
साहिलच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याची मागणी
तपासाला तात्काळ गती देऊन दोषींवर कायद्यानुसार कठोर पावले उचलावीत आणि साहिलच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी लोकप्रतिनिधींनी केली. आयआयटी मुंबईत द्वितीय वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. संस्थात्मक भेदभाव, मानसिक त्रास आणि दबावामुळेच साहिलचा बळी गेल्याचा आरोप त्याच्या पालकांनी व विविध विद्यार्थी संघटनांनी केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू असूनही आरोपींवर अटकेची कारवाई न झाल्याने लोकप्रतिनिधी आक्रमक झाले आहेत.








