
ठाणे जिल्ह्यातील लाखो मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि सतर्क करणारी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR मोहिमेत तब्बल २८ लाख ६० हजार २६६ मतदारांचे गणना अर्ज जमा न झाल्याने त्यांची नावे मतदार यादीबाहेर जाण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, मतदारांसाठी अद्यापही संधी संपलेली नाही. आपले नाव यादीत कायम ठेवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
तब्बल २ लाख २२ हजार ७०६ मतदारांचा मृत्यू झाल्याची नोंद
आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी किंवा समाविष्ट करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत गणना अर्ज आणि आवश्यक परिशिष्ट सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आता निवडणूक विभागाने बीएलओ सोबतच व्हॉट्सॲप, ई-मेल आणि एसएमएसचाही आधार घेतला आहे. ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत या मोहिमेची सविस्तर माहिती दिली. जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील एकूण २८ लाख ६० हजार २६६ मतदार ‘वगळलेल्या वर्गवारीत’ नोंदवले गेले आहेत. यामध्ये तब्बल २ लाख २२ हजार ७०६ मतदारांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
धक्कादायक बाब म्हणजे १७ लाख ८ हजार ४५ मतदारांचा पत्ता सापडलेला नाही
सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे १७ लाख ८ हजार ४५ मतदारांचा पत्ता सापडलेला नाही किंवा ते संबंधित ठिकाणी अनुपस्थित असल्याचे आढळले आहे. याशिवाय ७ लाख ३५ हजार १४४ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. अन्य ४१ हजार ३३ मतदारांनी गणना प्रपत्र भरण्यास नकार दर्शविला आहे. यापैकी १ लाख ५३ हजार ३३८ मतदारांची आधीच नोंदणी झाली आहे. गणना अर्जांचे वितरण आणि संकलन करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज जमा न झालेल्या मतदारांनी आपली नोंद तपासून बीएलओशी संपर्क साधावा आणि आवश्यक अर्ज आणि परिशिष्टांसह कागदपत्रे सादर करावीत. असे निवडणुक विभागाने स्पष्ट केले.
बीएलओशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी
दरम्यान, मतदारांनी केवळ निवडणुकीच्या वेळी मतदानाचा हक्क बजावण्यापुरते मर्यादित न राहता, आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची आताच खात्री करणे गरजेचे आहे. अर्ज जमा न केलेल्या मतदारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता बीएलओशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
२२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार
एसआयआर प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. १० डिसेंबर पर्यंत गणना अर्ज निकाली काढण्याचे नियोजन असून त्यानंतर नोटीस देऊन दावे आणि हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. अखेर २२ डिसेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे केवळ निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाण्याऐवजी, तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, याची आजच खात्री करा. अन्यथा मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागू शकते.








