
भारतीय राजकारणाची दिशा बदलणारा एक अत्यंत मोठा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. सर्वप्रथम, डिलिमिटेशन म्हणजे जाणून घेऊ. डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघांची पुनर्रचना. सोप्या भाषेत सांगायचे तर, देशातील लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि प्रतिनिधित्वाचा विचार करून लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या सीमा निश्चित करणे किंवा त्यांची संख्या बदलणे म्हणजे डिलिमिटेशन.
महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यात आलं
या प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकातील सर्वात मोठी तरतूद म्हणजे सर्व राज्यांमधील लोकसभेच्या जागा सरसकट ५० टक्क्यांनी वाढवणे. सध्याच्या ५४३ जागांवरून ही संख्या सुमारे ८१५ पर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, पुढील २५ वर्षे म्हणजेच २०५१ पर्यंत जागांच्या प्रमाणात बदल न करण्याचा किंवा मर्यादा कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय, मतदारसंघ पुनर्रचनेच्या माध्यमातून महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्याशी हे विधेयक जोडण्यात आलं असून, ते २०२९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू होणे अपेक्षित आहे. ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे आणि २ डिसेंबरपासून राज्यसभेचे विशेष अधिवेशन सुरू होत असून, तिथे हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.
विधेयकाचे संभाव्य फायदे
पहिला मोठा फायदा म्हणजे लोकसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊन २०२९ च्या निवडणुकीपूर्वी महिलांचा सहभाग वाढू शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, सर्व राज्यांमध्ये ५० टक्के समान प्रमाणात जागा वाढवण्याची तरतूद आहे. लोकसभेच्या जागा वाढल्याने प्रत्येक खासदारावरील मतदारांचा भार विभागला जाऊन अधिक प्रभावी प्रतिनिधित्व मिळू शकते.
विकासाच्या नावाखाली आणखी किती लूट होण्याची शक्यता
या निर्णयावर काही संभाव्य तोटे आणि राजकीय आक्षेपही घेतले जात आहेत. लोकसभेसह विधानसभांच्या जागा वाढल्यास खासदार आणि आमदारांचे पगार, भत्ते, निवासस्थान, सुरक्षा, प्रवास खर्च, कार्यालयीन व्यवस्था आणि पेन्शन यामुळे सरकारी तिजोरीवरील आणि करदात्यांवरील आर्थिक बोजा वाढेल, अशी टीका होत आहे. कारण आता आपण निवडणुका पाहत आहोत त्यात चक्क पैशाचा पाऊस पडत आहे,मग त्यात आणखी खासदार संख्या वाढल्यानंतर निवडणुकीत यात किती भर होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे,याचा भार देशावर किती पडेल,विकासाच्या नावाखाली आणखी किती लूट होईल? दरम्यान या घटनादुरुस्तीसाठी दोन्ही सभागृहांत आवश्यक असलेले दोन-तृतीयांश बहुमत जुळवणे हे मोठे आव्हान असणार आहे. आता येत्या संसदीय अधिवेशनात हे विधेयक मांडले गेल्यानंतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात आणि यावर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.








