देवीच्या दर्शनाला जाताना भाविकांसोबत दुर्देवी घटना घडली आहे. भाविकांच्या गर्दीतच थेट ट्रक घुसल्याने अपघात घडला. या अपघातात थेट १२ ते १५ जणांना मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर तब्बल ४० जण जखमी आहेत. यातील मृतांचे आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
४०हून अधिक जखमी तर, १५ जणांचा मृत्यू
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ही घटना घडली असून . शीतला माता मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांसोबत ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील शीतला माता मंदिराजवळ भीषण अपघाताची घटना घडली आहे. रविवारी 18 ऑक्टोबर रात्री उशिरा धानाने भरलेला एक ट्रक पोलिसांचा बॅरिकेड तोडून उतारावरून घसरला आणि रस्त्यावरील भाविकांना अक्षरशः चिरडत गेला. यात 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर ४० जणं किंवा त्याहीपेक्षा जास्तजण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश होता. या अपघातामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तर या अपघातानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हा ट्रक रस्त्यावर थांबवण्यात आला होता, परंतु तो बॅरिकेड्स तोडून पुढे गेला. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो उतारावरून वेगाने खाली आला आणि मंदिराच्या बाहेरील भिंतीवर व प्रवेशद्वारावर जाऊन आदळला. या अपघातात रस्त्यावरून चाललेले भाविक वाहनाखाली चिरडले गेले.
ट्रक उड्डाणपुलाच्या दिशेनं अचानक मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर कसा आला?
जिल्हाधिकारी चौहान यांनी सांगितलं की, ट्रक उड्डाणपुलाच्या दिशेनं अचानक मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर आला आणि बॅरिकेड्स तोडून मंदिरापर्यंत पोहोचला. हा प्रकार नेमका कसा घडला, याचा तपास सुरू आहे.
नवरात्रोत्सवादरम्यान या रस्त्यावर बॅरिकेड्स आणि पोलिसांची चेक पोस्ट तैनात होती. असं असतानाही ट्रक मंदिराच्या मार्गावर कसा घुसला, याची चौकशी केली जात आहे. ट्रकमध्ये नेमकी काय तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि तो डाव्या बाजूला कसा वळला, हे तपासण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे (आरटीओ) पथकही पाठवण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरू असून, त्यांची सीटी स्कॅन आणि एक्स-रे तपासणी केली जात आहे, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
#WATCH | Madhya Pradesh | Early morning visuals from the spot where a truck ran over several people near Sheetla Mata Mandir in Gwalior, claiming the lives of 11 people and leaving 29 people injured https://t.co/zyoabIhQ8a
— ANI (@ANI) October 18, 2026
घटनास्थळी कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी
ग्वाल्हेरचे एसएसपी धर्मवीर सिंग म्हणाले, “ही एक अत्यंत दुःखद घटना आहे. मोठ्या संख्येने भाविक शीतला माता मंदिराकडे जात होते. छिनोरहून येणाऱ्या रस्त्याला तीव्र उतार आहे, जिथे अवजड वाहनांच्या वाहतुकीस मनाई आहे.” ते पुढे म्हणाले, “पहाटे सुमारे दीड वाजता, धानाने भरलेला एक ट्रक तिथे थांबवण्यात आला. ट्रकने पोलिसांचा बॅरिकेड तोडून तो वेगाने पुढे गेला. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रक उतारावरून खाली घसरला आणि मंदिराच्या बाहेरील भिंतीला व प्रवेशद्वाराला धडकला. रस्त्यावरील भाविक ट्रकखाली चिरडले गेल्याने हा अपघात झाला. घटनास्थळी कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले.” एसएसपी पुढे म्हणाले, “पाच ते सहा रुग्णांची प्रकृती फ्रॅक्चरमुळे गंभीर असून, बाकीच्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.”
या अपघातातील जखमींची माहिती अन्य रुग्णालयांकडूनही गोळा केली जात आहे. मृतांपैकी आतापर्यंत 8 जणांची ओळख पटली असल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
दरम्यान जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.








