ऐन दिवाळीत ठाणे एटीएसने मोठी कारवाई केली आहे. एटीएसने डोंबिवलीतून कुप्रसिद्ध नक्षलवाद्याला अटक केली आहे. या अटकेच्या कारवाईने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ठाणे एटीएसने कुप्रसिद्ध फरार झारखंडमधील नक्षलवाद्याला अटक केली आहे. झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर 10 लाख रुपयांचं बक्षिस ठेवलं होतं. ठाणे एटीएसने डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरात ही कारवाई केली आहे. एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. या नक्षलवाद्याचा घातपाताचा कट होता का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या कारवाईने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
नक्षलवाद्यावर तब्बल 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीत ठाणे एटीएसने खूप मोठी कारवाई केली आहे. झारखंडमधून फरार झालेला नक्षलवादी ठाणे जिल्ह्यात येऊन लपला होता. झारखंड सरकारने या नक्षलवाद्यावर तब्बल 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. या नक्षलवाद्याला एटीएसने डोंबिवलीजवळील ठाकुर्ली परिसरातून उचलला. डोंबिवलीजवळील परिसरात येऊन लपलेल्या या नक्षलवाद्याचा घातपाताचा हेतू होता का, याचा शोध घेणे सुरू करण्यात आलं आहे. या प्रकरणी एटीएसने पुढील तपास देखील सुरू केला आहे. संजय सरोज यादव उर्फ संजय गोधरे उर्फ बुधारामची याला एटीएसने अटक केली. 45 वर्षीय नक्षलवादी संजय हा झारखंड राज्यातील पलामू भागातील देवगन या गावात राहायचा. ऐन दिवाळीत केलेल्या कारवाईने अनेक पोलीस यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती. आता त्याला ठाणे कोर्टात हजर केले जाणार आहे.
ऐन दिवाळीत गडचिरोलीत मोठी कारवाई
ऐन दिवाळीत गडचिरोलीत मोठी कारवाई करण्यात आली. गडचिरोली पोलीस दलाने सुरक्षा दलांवर घातपात घडविण्याच्या उद्देशने लपवून ठेवलेले शस्त्र आणि स्फोटक साहित्याचा साठा जप्त केलाय. पोलिसांनी कोरची तालुक्यात गॅरापत्ती भागात राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळलाय. गॅरापत्ती पोलीस ठाणे हद्दीत माओवाद्यांनी स्फोटके जमिनीत पुरल्याची माहिती मिळाली होती. माओवाद्यांवरील कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी-60 विशेष पथक, बॉम्ब शोधक व नाशक इत्यादी पथकांनी जंगलात जाऊन शोध मोहीम राबवत केली. त्यानंतर अतिदुर्गम व आंतराज्यीय सीमावर्ती भागातील तैनात जवानांनी ताब्यातील माओवादी आणि परिसराची कसून तापसणी केली. बीडीडीएस पथकांच्या जवानांनी स्फोटकाचा साठा शोधून काढत कारवाई केली.








