
मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पुण्यात मुसळधार पाऊस आणि होर्डिंग कोसळल्याची घटना
पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली असून, शहराच्या मध्यवर्ती भागांत जोरदार सरी कोसळल्या. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळील सणसवाडी येथे एक मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विमानतळ परिसरातही मुसळधार पावसामुळे नव्या टर्मिनलवर पाणी साचलं. ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे वादळी वाऱ्यांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे.
जालन्यात अवकाळी पावसाचा कहर – लग्न मंडप कोसळला
जालना जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. राजुर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप कोसळला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सोलापुरात पहिल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, आणि पंढरपूर परिसरात पूर्व मोसमी पावसाने दमदार सुरुवात केली आहे. या पावसामुळे शेतांमधून पाणी वाहून गेलं असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याच्या अभावामुळे संकटात सापडलेली लहानसहान पिकं या पावसामुळे वाचली आहेत.
कोकणात धुव्वाधार पाऊस, वीजपुरवठा खंडित
तळकोकणातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्यांचाही जोर आहे. विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून, संपूर्ण जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. गुहागर तालुक्यातही अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
जामनेरमध्ये वीज कोसळून चार म्हशी ठार
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुनासगाव येथे वीज कोसळून चार म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. शेतकरी गोपाल इंधाते यांच्या परिवारातील या म्हशी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होत्या. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून महिलांचा आक्रोश हृदयद्रावक होता.
राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जीवनमानावर परिणाम झाला आहे. काही भागात दिलासादायक स्थिती असली तरी, काही ठिकाणी या पावसामुळे हानीही झाली आहे. प्रशासनाकडून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.