
महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी चर्चा रंगू लागली आहे – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे बंधू पुन्हा एकत्र येणार का? या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे, कारण खुद्द उद्धव ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी युतीसंदर्भात सकारात्मक संकेत दिले आहेत.
मुंबई आणि कोल्हापूरसह राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये या चर्चेमुळे प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “हे दोघे ठाकरे बंधू एकत्र येणं ही काळाची गरज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकत्र आले, तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो.”
या पार्श्वभूमीवर माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देणं टाळत, “त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया राज ठाकरे देतील, मी कशी देणार? माझा काय संबंध? तुम्हीच जास्त तारे तोडत आहात. सध्या त्यावर काही बोलण्यासारखं नाही,” असे म्हणत विषयावरून हात झटकले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर “आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवू आणि जिंकू,” असा विश्वास व्यक्त केला.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मात्र या संभाव्य युतीवर टीका करत “सब कुछ लुटा कर मिला तो क्या हुआ” असा सिने डायलॉग टाकत टोला लगावला. ते म्हणाले, “शिवसेना आणि मनसे एकत्र आले तरी काही फरक पडणार नाही. जनता विकास बघते. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास होतोय. त्यामुळे लोक आमच्यासोबत आहेत.