
जालना जिल्ह्यातील वरुड गावातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पावसाने सध्या दडी मारल्याने शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या तयारीसाठी शेतात गेलेल्या एका शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शेतकाम करत असताना विद्युत तारेचा शॉक लागून वडिलांसह दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
ही घटना जालना तालुक्यातील वरुड गावात घडली. विनोद मस्के असे मृत पित्याचे नाव असून, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा समर्थ मस्के आणि मुलगी श्रद्धा मस्के या दोघांचाही मृत्यू झाला आहे. हे तिघेही पेरणीपूर्व कामांसाठी शेतात गेले असताना अचानक विद्युत तारेचा संपर्क आल्याने हा अपघात घडला.
घटनेनंतर तिघांनाही तत्काळ उपचारासाठी जालना शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. सध्या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.
या अपघातामुळे मस्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण वरुड गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तात्काळ मदतीची कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.