
आयपीएल 2025 च्या विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या जल्लोषात दुर्दैवी घटना घडली आहे. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जणांचा मृत्यू झाला असून 10 ते 15 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना मंगळवारी संध्याकाळी 5 ते 6 वाजताच्या सुमारास घडली, जेव्हा RCBच्या विजय जल्लोषासाठी हजारो चाहते स्टेडियमच्या दिशेने निघाले होते.
RCB ने यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा पराभव करून 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात RCB ने 6 धावांनी विजय मिळवला होता. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण कर्नाटकात आणि विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.
बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘विक्टरी सेलिब्रेशन’साठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी चाहत्यांनी गेट क्रमांक 3 जवळ मोठी धावपळ केली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आणि चेंगराचेंगरीत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, अनेक जखमींवर स्थानिक बॉवरिंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चेंगराचेंगरीमुळे स्टेडियम परिसरात वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी तत्काळ मदत कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
या दुर्घटनेच्या काही तासांपूर्वीच विधानसौधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी RCB टीमचा सत्कार केला होता. त्यानंतर टीम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दाखल होणार होती. मात्र, त्याआधीच हा दुर्दैवी प्रकार घडला.