
भाजप नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे आज नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी विविध राजकीय विषयांवर आपली ठाम भूमिका मांडत टीकेची झोड उठवली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे, प्यारे खान आणि ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर त्यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली.
आदित्य ठाकरेंना नाव बदलण्याचा सल्ला
महाराष्ट्र गौसेवा आयोगाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर 3 ते 8 जूनदरम्यान पशू बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयावर आदित्य ठाकरेंनी “सण साजरे करायला हवेत, पण सरकारने हस्तक्षेप करू नये” अशी भूमिका मांडली होती. यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरेंनी आपलं आडनाव बदलून ‘खान’ किंवा ‘शेख’ ठेवावं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नातवाने अशा प्रकारची वक्तव्ये करणं शोभत नाही.” त्यांनी यावरून ठाकरे कुटुंबाच्या परंपरेचा हवाला देत कठोर शब्दांत आदित्य यांच्यावर निशाणा साधला.
प्यारे खान यांना पलटवार
मंत्री राणेंच्या या वक्तव्यांवर अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस बजावली होती. यावर उत्तर देताना राणे म्हणाले, “प्यारे खान हे इस्लामला बदनाम करणारी भूमिका घेत आहेत. त्यांनी मुस्लिम समाजाचं प्रबोधन करावं, धार्मिक तेढ वाढवणारी विधानं देऊ नयेत.”
इको-फ्रेंडली बकरी ईदचा सल्ला
राणेंनी बकरी ईद इको-फ्रेंडली पद्धतीने साजरी करण्याची मागणी पुन्हा केली. “जसं हिंदू समाज इको-फ्रेंडली दिवाळी आणि होळी साजरी करतो, तसं मुस्लिम समाजानेही जबाबदारीने बकरी ईद साजरी करावी. सोसायट्यांमध्ये बकरे कापल्याने तणाव निर्माण होतो. त्यामुळे वाद, आणि उद्या दंगली होऊ शकतात. अशा परिस्थितीत मी दिलेला सल्ला समाजाच्या हिताचाच आहे,” असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.
ठाकरे बंधूंवर टोला
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील एकात्मतेच्या हालचालींवरही राणेंनी टोला लगावत, “ज्यांनी ठाकरे कुटुंब फोडलं, तेच आता एकत्रीकरणाचे लेक्चर देतात. हे कितपत योग्य आहे, याचा विचार जनता करेल,” असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रयत्नांवर शंका व्यक्त केली.