
अंधेरीच्या म्हात्रे मैदानाजवळ आज सकाळी मुंबईत एक मोठी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ड्रग्स माफियांचा पाठलाग करत असताना आरोपींनी भरधाव वेगाने गाडी चालवून चार नागरिकांना उडवल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जखमींना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, याप्रकरणाचा तपास जुहू पोलीस करत आहेत.
सुरुवातीच्या माहितीनुसार, सकाळपासूनच काही संशयित आरोपी म्हात्रे मैदान परिसरात फिरताना स्थानिकांनी पाहिले होते. पोलिसांना आधीच इनपुट मिळाल्याने त्यांनी त्या दिशेने हालचाल सुरू केली होती. आरोपी बांद्राहून निघाल्यापासून त्यांचा पाठलाग सुरू होता. मात्र अंधेरीतील म्हात्रे मैदानाजवळ आरोपींच्या गाडीने नियंत्रण सुटल्यामुळे त्यांनी चक्क तीन ते चार नागरिकांना उडवलं.
घटनास्थळी प्रसिद्ध पोलीस अधिकारी दया नायक तपासासाठी दाखल झाले आहेत. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात येत असून, तपास अधिक गतीने सुरू आहे.
आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी चार ते पाच बॅग्स जप्त केल्या आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स व रोकड असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ड्रग्स मोजण्यासाठी वापरलेला वजन काटा खूप मोठा असल्याने हजारो किलो ड्रग्स असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ही कारवाई कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पंचनामा प्रक्रिया सुरू आहे. मुंबईतील ड्रग्ज नेटवर्क उध्वस्त करण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.