भाजपा नेते व वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वरळी येथे झालेल्या मराठी विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या २० वर्षांनंतर झालेल्या ऐतिहासिक भेटीवर आपले मत व्यक्त केले आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले की, ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्याचा भाजपावर कोणताही परिणाम होणार नाही.
मुनगंटीवार म्हणाले, “दोन्ही भाऊ हिंदी भाषेच्या प्रश्नावर एकत्र आले आहेत. हे एका नवीन घटकांचे आगमन आहे. त्यांच्या प्रवेशाने मेरिटमधील विद्यार्थ्यांवर परिणाम होत नाही तसेच ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्याने भाजपच्या राजकीय समीकरणांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यांनी आपला स्वतःचा मार्ग निवडला आहे आणि भाजप आपला मार्ग निवडत राहील.” त्यांनी ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्याबाबत भाजपच्या वतीने शुभेच्छा देखील दिल्या आणि याबाबत कोणताही विरोध करण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले.
मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा जोरदारपणे स्पष्ट केले की, “सत्ता हे आमच्या पक्षाचे ध्येय कधीच नव्हते आणि सत्तेसाठी आमच्या पक्षाला कोणतेही धोरण आखण्याची आवश्यकता नाही.” पक्षातील काही सदस्यांकडून त्यांना बाजूला सारण्यात आल्याच्या चर्चांवर ते म्हणाले, “मी काहीही नाराज नाही. माझी पक्षातून कोंडी केली जात नाही. विधानसभेत गोरगरिबांचे प्रश्न उपस्थित करणे हे आमदाराचे कर्तव्य आहे आणि प्रश्न उपस्थित करणे म्हणजे सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असे नाही.”
ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्याचा आगामी महापालिका निवडणुकांवर काय परिणाम होईल, राज ठाकरे महाविकास आघाडीत सामील होतील की केवळ ठाकरे गटाशी युती करतील आणि काँग्रेसची भूमिका काय असेल यासारखे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत. परंतु, सुधीर मुनगंटीवार यांनी या सर्व घडामोडींचा भाजपावर कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्ट केले आहे.









