मुंबई – मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींची निर्दोष मुक्तता करताच न्यायव्यवस्थेवर विश्वास उडाल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया येत होत्या. मात्र त्वरित राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आणि त्यानंतर सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली. मात्र स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने कोठडीतून बाहेर आलेल्या आरोपींना पुन्हा तुरुंगात पाठवणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. या आरोपींना पुन्हा अटक करून तुरुंगात टाकण्याची अशी मागणी राज्य सरकारने केली नाही. पण या आरोपींना एका महिन्यातआ आपलं म्हणणं सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाने भविष्यात आदेश दिला तर तुरुंगातून बाहेर आलेल्या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे, सध्यातरी हे आरोपी तुरुंगाबाहेरच असणार आहेत.
11 जुलै 2006 मध्ये लोकलमध्ये 11 मिनिटांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. वांद्रे, माटुंगा रोड, माहिम जंक्शन, खार रोड, जोगेश्वरी, भाईंदर आणि बोरिवली हे परिसर स्फोटाने हादरले होते. यात तब्बल 209 जणांचा मृत्यू झाला होता तर 700 जण जखमी झाले होते. सत्र न्यायालयाने या प्रकरणात तब्बल 12 जणांना दोषी ठरवले. यात 5 जणांना फाशीची तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.









