पोटच्या पोरीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडात उघडकीस आला होता. आता या प्रकरणात सोशल मीडियात खळबळजनक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या धक्कादायक व्हिडिओत हत्या करण्यात आलेल्या प्रेमी युगुलांची हत्येपूर्वी गावातून धिंड काढण्यात आल्याचं दिसून येत आहे. ऑनर किलींगच्या या घटनेनं नांदेड जिल्हा हादरुन गेला. नको त्या अवस्थेत मुलीला सासरच्यांनी पकडले. त्यानंतर मुलीचे वडील, काका व आजोबांनी मुलीची सासरीच गावातून धिंड काढली. याप्रकरणी, मुलीचे आजोबा, काका आणि वडिलांना 5 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.
जन्मदात्याने स्वतःच्याच विवाहित मुलीसह तिच्या प्रियकराला मारहाण करून, जीव घेऊन, हात-पाय बांधून विहिरीत ढकलून दिल्याची खळबळजनक घटना 2 दिवसांपूर्वी समोर आली होती. नांदेड जिल्ह्यातील गोळेगावयेथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे. मुलीचा मृतदेह आधी हाती लागला, तर मुलाचा मृतदेह सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास विहिरीतून बाहेर काढला.










