सध्या सोशल रील व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही. आता रील मनोरंजनासाठी नसून त्या माध्यमातून समस्या मांडत असतात. अशीच रस्त्याची समस्या मांडली शाळेत जाण्याऱ्या मुलींनी आणि तेही अगदी पत्रकाराच्या भूमिकेत येऊन. कर्जत-कोंदिवडे मार्गाची दयनीय अवस्था दाखवणारा त्यांचा छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
छत्रीचा माईक करत शाळकरी विद्यार्थिनी बनल्या रिपोर्टरल, प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल
रायगडच्या कर्जत तालुक्यातील कोंदिवडे गावातील शाळकरी विद्यार्थिनींनी गावातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे धाडसं केलं. रस्त्यांची समस्या मांडण्यासाठी या विद्यार्थिनींनी थेट रिपोर्टर बनवून रस्त्याच्या अवस्थेचा ग्राऊंड रिपोर्टच बनवला. त्यांनी हातातील छत्रीचा माईक म्हणून वापर केला. एवढंच नाही पत्रकाराप्रमाणे गावातील रस्त्यांची पाहणी करत प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केली.
विद्यार्थिनींच्या एका कृतीमुळे चक्क गावातील रस्ता दुरुस्त
मात्र या विद्यार्थिनींच्या याच धाडसामुळे आणि ही रील व्हायरल झाल्यानंतर गावचा रास्ता दुरूस्त झाला. गावातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे, ठिकठिकाणी साचलेले चिखलाचे डबके आणि त्यामुळे निर्माण होणारी अपघाताची शक्यता विद्यार्थिनींनी कॅमेऱ्यासमोर मांडली. पावसाळ्यात या रस्त्यांची अवस्था आणखी बिकट होत असून, शाळेत ये-जा करताना विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी आपल्या रिपोर्टमधून दाखवून दिले. हातात छत्री घेऊन माईक म्हणून वापरत त्यांनी बातमीची नक्कल केली. ही कृती केवळ तक्रार नव्हती, तर शिक्षणातून मिळालेल्या निरीक्षणशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्याचा प्रत्यक्ष वापर करत त्यांनी रस्त्याचे वास्तव मांडले.त्याचा फार मोठा परिणाम पाहायला मिळाला.
मुलींनी अगदीच सोप्या भाषेत वस्तुस्थिती मांडली
विशेष म्हणजे, मोठमोठ्या शब्दांऐवजी रोजच्या अनुभवातून आलेली या मुलींनी अगदीच सोप्या भाषेत वस्तुस्थिती मांडली.त्यांच्या या अनोख्या रिपोर्टिंगमधून गावातील रस्त्यांची वास्तविक परिस्थिती समोर आली आहे. या रिपोर्टींग दरम्यान नेहा घारे हिने रिपोर्टरची भूमिका निभावली तर मानसी पवार हिने कॅमेरा हाताळला, तर छत्रीचा माईक केला.
मुलींचे सोशल मीडियावर कौतुक
व्हायरल होणाऱ्या या छोट्या व्हिडिओने दाखवले की, योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाली तर शाळकरी मुलेही सामाजिक बदलाचे कारण बनू शकतात. अशा उपक्रमांना शाळा, पालक आणि प्रशासन यांनी पाठिंबा दिला तर भविष्यात अधिक जागरूक आणि सक्रिय पिढी घडेल, अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.कारण या विद्यार्थिनींच्या या बिनधास्त रिपोर्टींगमुळे गावचा रास्ता चक्क तातडीने दुरूस्त झाला आहे. यामुळे सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
तालुक्यातील शेकडो पत्रकार नेमके काय करत होते हा प्रश्न मात्र नागरिकांच्या मनात कायम राहील!








