मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांची अखेर मुंबईत आंदोलन करण्याची तारीख ठरली आहे. आंदोलनाची दिशा स्पष्ट झालीअसून आता मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या बैठकीत जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली.
आंदोलनाची तारीख अखेर ठरली
सरकारकडून ठोस निर्णय घेण्यात आला नाही तर मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर आता आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून १५ सप्टेंबरपासून मुंबईकडे प्रवास सुरू करणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केलं. मुंबईकडे जाताना टप्प्याटप्प्याने मुक्काम करण्यात येणार असून पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली या ठिकाणी मुक्काम करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यानंतर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. सरकारकडून काही निर्णय जाहीर करण्यात आले असले तरी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा आरक्षणाशी संबंधित प्रमुख मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नसल्याचे जरांगे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता आंदोलन मुंबईत करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
मुंबईकडे जाताना आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहन
मुंबईकडे जाताना आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे आवाहनही जरांगे यांनी समर्थकांना केले आहे. दगडफेक किंवा जाळपोळ न करता शांततेने आंदोलन करावे, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनासाठी येऊ न शकणाऱ्या मराठा बांधवांनी मार्गावर उपस्थित राहून आशीर्वाद, पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला रोखण्यासाठी दाखल झालेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मुंबईत येण्यास प्रतिबंध करण्यास नकार दिला आहे. शांततामय आंदोलन करण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारवर असल्याचेही नमूद केले आहे.
आता १५ सप्टेंबरपासून जरांगेंचा मुंबईकडे प्रवास, मार्गातील मुक्काम आणि आझाद मैदानावरील आंदोलन याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आता पुन्हा निर्णायक टप्प्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.
कसा असणार सराटी ते मुंबईचा मुक्काम
१५ सप्टेंबर – पहिला मुक्काम: पाटोदा ,जि. बीड
१६ सप्टेंबर -दुसरा मुक्काम: श्रीगोंदा , जि. अहिल्यानगर
१७ सप्टेंबर -तिसरा मुक्काम: हडपसर, जि. पुणे
१८ सप्टेंबर – चौथा मुक्काम: खोपोली, जि. रायगड
१९ सप्टेंबर – पाचवा दिवस: थेट आझाद मैदान, मुंबई, येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू होणार








