
बीड जिल्ह्यातील माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या वाहनाला लातूर तुळजापूर रस्त्यावरील बेलकुंड उड्डाणपूलावर आज भीषण अपघात झाला. वाहन स्लिप होऊन सुरक्षा कठडा तोडत चार वेळा पलटी घेतल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत आर.टी. देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. सध्या ते उपचाराखाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
राज्यात सध्या रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत अपघातांचे अनेक प्रकार माध्यमांतून समोर आले आहेत. त्यातच आजच्या घटनेने पुन्हा एकदा रस्त्यावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि मदतकार्य करणाऱ्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, देशमुख यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आहे.