
महाराष्ट्रासह देशभरात ‘अनाथांची माय’ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा वापर करून तरुणांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नासाठी मुली आहेत असे सांगून अनेक इच्छुक तरुणांकडून रजिस्ट्रेशनच्या नावाखाली 15,000 रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या संपूर्ण फसवणुकीचा पर्दाफाश झाल्यानंतर सिंधुताईंच्या संस्थेने सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रारंभी पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं चित्र होतं, मात्र एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
कशा प्रकारे केली जात होती फसवणूक?
आरोपी व्यक्ती किंवा टोळी सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील संस्थेचा हवाला देऊन तरुणांना फोन करत होती. लग्नासाठी मुली आश्रमात आहेत, असं सांगून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशनसाठी PhonePe, Google Pay यांसारख्या डिजिटल माध्यमातून १५ हजार रुपये मागवले जात होते. विश्वासार्हता वाढवण्यासाठी सिंधुताईंचं नाव आणि पुण्यातील आश्रमाचा संदर्भ वापरला जात होता.
कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल?
सासवड पोलीस ठाण्यात या प्रकरणी IPC 419(4), 418(4), 420(2) आणि आयटी ऍक्ट कलम 66 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू असून, या रॅकेटचा माग काढण्यासाठी सायबर क्राइम विभागाची मदत घेतली जात आहे.
समाजातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा मुलांच्या विवाहासाठी पालकांमध्ये असलेली अस्वस्थता आणि असुरक्षितता समोर आली आहे. समाजातील अनेक पालक, नातेवाईक मुलगी मिळावी म्हणून कोणतीही किंमत देण्यास तयार असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे.