
शिवसेनेच्या एकसंघतेचा मुद्दा पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आणि शिंदे गटातील शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, “राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं, हीच खरी शिवसेना आहे. आम्ही ज्या शिवसेनेसाठी लढलो, ती पुन्हा उभी राहण्यासाठी ही तिघांची एकता अत्यावश्यक आहे.”
बाळासाहेबांचा वारसा आणि शिवसेनेचं विभाजन
गजानन कीर्तीकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही त्यांनी राज आणि उद्धव यांच्यातील दुरावा मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पक्षाचे विभाजन झाले आणि शिवसेना व मनसेमुळे मूळ विचारधारेला धक्का बसला. आज शिवसेना दोन भागांमध्ये विभागली गेली आहे — एकनाथ शिंदेंची भाजपसोबत असलेली शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीतील शिवसेना.
अटी योग्य – पण विचारधारा पुन्हा एक करणे गरजेचे
राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं, ही अनेक जुन्या शिवसैनिकांची इच्छा आहे. दोघांनी काही अटी घातल्या आहेत, त्या योग्यच आहेत, कारण एक मजबूत शिवसेना तयार करण्यासाठी काही स्पष्ट भूमिका आवश्यक असतात. गजानन कीर्तीकर म्हणतात की, “आज शिवसेना भाजपप्रणित आणि काँग्रेसप्रणित झाली आहे, पण शिवसैनिकांना हवी आहे ती बाळासाहेबांची मूळ विचारधारा.”
शिंदेंनाही सोबत यावं लागेल
“जर शिवसेना पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांवर उभी करायची असेल, तर राज आणि उद्धव यांच्यासोबत शिंदेंनीही यावं लागेल,” असं मत व्यक्त करत कीर्तीकर यांनी तिघांच्या एकत्र येण्यावर भर दिला आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व, आक्रमक भूमिका, मराठी अस्मिता आणि राष्ट्रीयत्व यांचे प्रतिनिधित्व करणारी शिवसेना पुन्हा उभी करायची असेल तर ही त्रिमूर्ती एकत्र येणं आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
भाजपवर निशाणा – “विभाजित शिवसेना भाजपला हवी आहे”
गजानन कीर्तीकर यांनी भाजपवरही परखड टीका केली. “भाजपला शिवसेना एकत्र हवी नाही, त्यांना ती विभाजितच हवी आहे. उद्धव ठाकरेंनी सोबत दिली, आता शिंदेंनी दिली, पण अखंड शिवसेना नसल्यामुळे भाजपला पूर्ण ताकद मिळालेली नाही. त्यामुळे भाजपच्या डावपेचात शिवसेनेचं एकत्र येणं घातक ठरेल, म्हणून ते याला विरोध करतील,” असं ते म्हणाले.
अखंड शिवसेनेसाठी पुढाकार घेणार – गजानन कीर्तीकर
कीर्तीकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “मी बाळासाहेबांसोबत अनेक वर्षं काम केलंय. मला अधिकार आहे. मी राज, उद्धव आणि शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेईन. पुन्हा आमचे जुने दिवस येण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न राहील.”