गरिबी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ध्येयाचा पाठलाग केला की यश नक्कीच मिळते हे मालाडच्या लेकीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. मालाड पश्चिम येथील पटेल वाडीत राहणाऱ्या गायत्री हिने पश्चिम बंगाल येथे पार पडलेल्या ‘नॅशनल फेडरेशन कप २०२६’ पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर उंच झाली आहे.
अशी राहिली सुवर्ण कामगिरी
राष्ट्रीय पातळीवरील या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत गायत्रीने ६३ किलो वजन गटामध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होतं. तिने तिन्ही प्रकारांत दमदार कामगिरी नोंदवली आहे. स्क्वॅट ११२.५ किलो तर, बेंच प्रेस ५२.५ किलो, डेडलिफ्ट १२० किलो. तिन्ही प्रकार मिळून तिने उचललेल्या एकूण वजनाच्या जोरावर प्रतिस्पर्धकांना मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत रचला इतिहास
गायत्रीचे कुटुंब अत्यंत सामान्य आणि गरीब पार्श्वभूमीतून येते. आर्थिक अडचणी आणि अपुऱ्या सुविधांचा सामना करत तिने पॉवर लिफ्टिंगसारख्या कठीण खेळात आपले स्थान निर्माण केले आहे. यापूर्वीही तिने अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली आहे.
स्वप्नांचे चीज आणि तरुणांसाठी प्रेरणा
गायत्रीने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामुळे तिच्या आई-वडिलांच्या वर्षांच्या कष्टांचे आणि संघर्षाचे चीज झाले आहे. “योग्य मार्गदर्शन, जिद्द आणि कठोर परिश्रम घेतले तर कोणतीही परिस्थिती यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही,” असा संदेश गायत्रीच्या या कामगिरीतून मिळतो. सध्या तिच्यावर क्रीडा क्षेत्रातून व स्थानिक नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.








