चाकण शहराची मुख्य ओळख असलेल्या या औद्योगिक क्षेत्रालाच आता मोठा धक्का बसला आहे. या संभाव्य स्थलांतरामुळे सुमारे १,००० कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल ठप्प होण्याची आणि ४,००० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार येण्याची भीती निर्माण झाली आहे.याचं कारण म्हणजे खड्ड्यांचे साम्राज्य अन् ट्रॅफिकचा त्रास.
चाकणमध्ये उद्योगांना जागेची टंचाई भासू लागली
चाकण औद्योगिक क्षेत्र सुमारे सात हजार एकरांवर विस्तारले आहे.या क्षेत्राबाहेर तेवढ्याच जागेवर औद्योगिक विस्तार झाला आहे.पुणे चाकण औद्योगिक क्षेत्र सुमारे सात हजार एकरांवर विस्तारले असून, या क्षेत्राबाहेर तेवढ्याच जागेवर औद्योगिक विस्तार झाला आहे. गेल्या तीन वर्षांत चाकणमधून किती उद्योग स्थलांतरित झाले अथवा नवीन उद्योग आले याची माहिती उद्योग विभागाच्या आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान, चाकणमध्ये उद्योगांना जागेची टंचाई भासू लागल्यामुळे औद्योगिक क्षेत्राचा सहावा टप्पा विकसित करण्याचे मोठे पाऊल उद्योग विभाग आता उचलणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
खड्डे अन् वाहतूक कोंडीला वैतागून चाकणमधून कंपन्या बाहेर
मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा, धुंदाई यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे जागतिक पातळीवर नावारूपाला आलेली चाकण औद्योगिक वसाहत सध्या रस्त्यांवरील खड्डे, रोजची अभूतपूर्व वाहतूक कोंडी, खंडित वीज-पाणी आणि वाढते अपघात यामुळे अडचणीत सापडली आहे. याच त्रासाला कंटाळून अखेर चाकण परिसरातील २० लघुउद्योगांनी येथून गाशा गुंडाळत साताऱ्यातील खंडाळा एमआयडीसीमध्ये स्थलांतरित होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या २० कंपन्यांनी एकत्र येत संघटना स्थापन केली असून, खंडाळ्यात जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान केल्या आहेत.
कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडतंय पण प्रशासनाचे दुर्लक्ष
चाकण एमआयडीसीमधील पायाभूत सुविधांची दुरवस्था आहे. दररोजच्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी असून ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. वाहतूक कोंडीमुळे कामगारांना कंपनीत पोहोचायला तासनतास उशीर होतो, ज्यामुळे कारखान्यांमधील उत्पादकता पार कोलमडली आहे. अनिश्चित पाणीपुरवठा आणि सातत्याने खंडित होणाऱ्या विजेमुळे कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, कचऱ्याचे अपुरे व्यवस्थापन आणि वाढते प्रदूषण यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडत आहे. चाकण सोडून जाण्याचा निर्णय उद्योजकांनी घाईघाईत घेतलेला नाही, तर त्यांनी गेल्या १४ महिन्यांपासून प्रशासनाला याबाबत तक्रारी करत असून प्रशासनाने हवी तशी दखल न दिल्याने अखेर हा निर्णय घेण्यात आला.
२० कंपन्यांनी १४ महिन्यांपूर्वी एकत्र येत ‘अनक्लॉग चाकण’ नावाने ऑनलाइन चळवळ उभारली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी तसेच PMRDA आणि MIDC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कचरा, वीज, पाणी आणि वाहतूक कोंडीबाबत शेकडो वेळा पत्रव्यवहार करण्यात आला. समस्या सोडवण्यासाठी PMRDA कार्यालयावर थेट मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र,एवढे सगळे करूनही रस्ते आणि वाहतूक कोंडी या दोन प्रमुख बाबींवर कोणतीच उपाययोजना झाली नाही.
कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चाकणच्या या कंपन्या खंडाळ्यात वसण्याच्या तयारी असल्या तरी यामुळे स्थानिक कामगारांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे. नोकरी गेली तर कुटुंबावर थेट उपासमारीची वेळ येईल अशी विदारकता कामगारांनी मांडली आहे. चाकणच्या औद्योगिक क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या लघुउद्योगांचे स्थलांतरण थांबवण्यासाठी आता तरी प्रशासन आणि राज्य सरकार तातडीने कठोर पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








