गोपाळकाला निमित्त मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांमध्ये दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय.पण याच उत्साहाला गालबोट लागलं आहे ते गोविंदांच्या जखमी होण्यामुळे. गोविंदा जखमी होण्याची पहिली दुर्घटना मुंबईत घडली आहे. मुंबईच्या मालाडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सर्वत्र जल्लोष सुरू असताना मुंबईत मात्र या सणाला गालबोट लागलं आहे. 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. दहीहंडी फोडताना बाजूचा कॉलम पडून 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्यामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी असं सजग नागरिक सांगत आहेत. आतापर्यंत दहीहंडी उत्सवात 32 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे.
दहीहंडी उत्सवाचा उत्साह आणि जल्लोष सुरू असताना मानवी मनोरे रचण्याच्या थरारात मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत ३२ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मुंबईत आतापर्यंत 32 गोविंदा जखमी
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत दुपारी ३ वाजेपर्यंत ३२ गोविंदा जखमी झाले आहेत. यांपैकी सीटी रुग्णालयात 29 जखमी गोविंदाना दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 25 जणांवर उपचार करून सोडलं. अजूनही चार गोविंदावर उपचार सुरू असून त्यांची स्थिती स्थिर असल्याचं बोललं जात आहे. ईएस रुग्णालयात 2 गोविंदा जखमी आहेत. डब्ल्यूएस रुग्णालयात आणखी एक गोविंदा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आलं आहे. जखमींचा आकडा रात्रीपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोविंदांनी उत्साहाच्या भरात कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी काळजी घ्यावी.
३२ जखमींपैकी २८ जणांना डिस्चार्ज
तर अशा प्रकारे पश्चिम उपनगरातील रुग्णालयांमध्ये एका गोविंदाला दुखापत झाली. त्याच्यावर आवश्यक उपचार केल्यानंतर त्यालाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही विभागांतील रुग्णालयांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार एकूण ३२ जखमींपैकी २८ जण घरी परतले असून, चार जणांवर उपचार सुरू आहेत.
दहीहंडीच्या थरारात गोविंदा पथके एकापाठोपाठ एक मानवी मनोरे रचत असताना प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जखमी गोविंदांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सरकारी आणि महापालिकेची रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत.
पुण्यातही एका महिलेचा मृत्यू
पिंपरी चिंचवडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. लोखंडी कमान कोसळल्याने 45 वर्षीय सलमा पठाण यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, रात्री दहीहंडीची सजावट काढण्याचं काम सुरू असताना लोखंडाचा तुकडा त्यांच्या डोक्यावर पडला. त्यानंतर गंभीर अवस्थेतच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सलमा पठाण यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.








