राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा बीडमधील प्रमुख चेहरा आमदार धनंजय मुंडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जीममधला असून धनंजय मुंडे यांनी वर्कआऊट करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मुंडे यांनी काही काव्यपंक्ती लिहित राजकीय पुनरागमनाचे संकेत दिल्याची चर्चा पुन्हा राजकीय वर्तुळात रंगली आहे.’काटे खोलवर रुतले,तरी पाऊल पुढे टाकतो आहे’, अशा काव्यपंक्ती लिहित धनंजय मुंडे यांनी वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात ‘कमबॅक’ करणार?
काही दिवसांपूर्वी परळीमधील एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका वक्तव्याची मोठी चर्चा रंगली होती. “सर्व क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालंय. पण येणारा काळ आपलाच आहे आणि चमत्कार दाखवावाच लागेलच”, असं सूचक भाष्य धनंजय मुंडे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात ‘कमबॅक’ करणार? अशा चर्चांनी जोर धरला होता.
धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता
मागील काही काळापासून धनंजय मुंडे हे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर आहेत. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती, त्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून मुंडे हे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर आहेत.
View this post on Instagram
धनंजय मुंडेंच्या वर्कआऊट व्हिडीओची चर्चा
धनंजय मुंडे यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून जीमममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे हे जीममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
धनंजय मुंडेंची पोस्ट काय आहे?
“काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…भेगाळलेले पाय आणि घायाळ मन, अजूनही धैर्य टिकवून आहे…निंदा-दूषणे आता न भिडती, अडखळत मार्ग काढतोच आहे…हरवण्याची आता बिशाद कुणाची, स्वतःशी सुद्धा लढतो आहे…” असं धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांच्या पोस्टची चर्चा प्रचंड प्रमाणात होत असताना दिसत आहे. दरम्यान,धनंजय मुंडे यांच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय आहे आणि ते या व्हिडीओमधून काय संकेत देऊ पाहत आहेत अशा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.








