मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा अकरावा दिवस आहे. सरकारचे शिष्टमंडळ भेटून गेल्यावर आणि त्यांनी आश्वासन देऊनही मागणी पूर्ण करण्यासाठी कोणतीच हालचाल होत नसल्याने त्यांनी पाणी आणि उपचारास दोन दिवसांपूर्वी नकार दिला होता. पण त्यामुळे त्यांची तब्येत खालावली असून रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झालं , तसेच त्यांचे सात किलो वजन कमी झालं आहे त्यामुळे काल रात्री मध्यरात्री जरांगे पाटील यांची तब्येत अजून खालावली.
रात्री अडीच वाजता जरांगेंची तब्येत खालावली
जरांगेंच्या तब्येतीबाबत समजताच सरकार खडबडून जागे झाल्याच बोललं जात आहे. रात्री अडीच वाजता तपासणी केल्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याची माहिती मंत्र्यांना देण्यात आली. ही मिळताच मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी फोन करून सकाळपासून कार्यवाही सुरू करतो असे आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी सलाईन घेतले. तसेच सर्व प्रकारच्या मागण्यांवर सरकार काम करत आहे, त्या पूर्ण होतील, असे आश्वासन मंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी दिले असल्याचा दावा जरांगे समर्थकांकडून केला जात आहे.दरम्यान प्रकृती खालावल्यानंतर मध्यरात्री मराठा आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखत टायर जाळले तर आज देखील आंदोलनं होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे आणि त्यांनी मुंबई येथे आंदोलन करण्याच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मध्यरात्री बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर महत्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीला महायुतीमधील दिग्गज नेते उपस्थित होते.
जरांगे यांच्या मागण्यांबाबत चर्चा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. वर्षा बंगल्यावरील ही बैठक रात्री दोन वाजता संपली. तसेच मराठा समाजाला न्याय देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रविंद्र चव्हाण, प्रसाद लाड हे नेते होते उपस्थित होते. जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालं होतं. या बैठकीत नेमकी काय झाली, याविषयी अधिकृत माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळे जरांगेंच्या उपोषणाच्या ११ व्या दिवशी नेमकं काय निर्णय होणार हे पाहणं फार महत्त्वाचं आहे.








