श्रीरामपूरच्या पावन भूमीत लोक कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने भव्य कवी संमेलन आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात लेखक गोरक्षनाथ पवार लिखित ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १३ सप्टेंबर २०२६ रोजी अतिशय उत्साहात व दिमाखात पार पडला. ज्येष्ठ कवी व गीतकार बाबासाहेब पवार यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.
साहित्यिक अन् सामाजिक दिग्गजांच्या हस्ते ग्रंथानावरण
या भव्य काव्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. मोहिनीराज होन सर, ज्येष्ठ कवी रूपचंद शिदोरे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रजी काळराव, प्रा. मांडलिक सर, ज्येष्ठ साहित्यिक बाबुराव उपाध्ये, सामाजिक कार्यकर्ते मिथुन चव्हाण, कारभारी नरोटे, कवी बाळासाहेब मुंतोडे, कवयित्री बेनझीर शेख, कवी ॲड. संजय माकोने सर, कवी सुरेश वैरागर, कवी प्रवीण गवळी, कवयित्री कविता अढांगळे, ज्येष्ठ साहित्यिक सायमनजी भारस्कर, ॲड. भाऊसाहेब पवार, कवी श्री. जाधव आणि कार्यक्रमाचे आयोजक बाबासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकाचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले.
१८ कर्तृत्ववान मान्यवरांच्या यशोगाथांचा पट
एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या गोरक्षनाथ पवार यांनी आपल्या लेखन आणि काव्यप्रतिभेने साहित्यात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतीच त्यांची ‘रेडिओ नगर’वर विशेष मुलाखत पार पडली असून, त्यामध्ये त्यांनी बालपणापासूनचा संघर्षमय प्रवास मांडला होता.
यापूर्वी २०२५ मध्ये मुंबईतील जागृत न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्त संपादक अमोल भालेराव यांच्या पुढाकाराने आणि प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर यांच्या हस्ते ‘चमकणारे दिवे (भाग १)’ चे प्रकाशन झाले होते. त्यात १४ मान्यवरांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला होता.
पुस्तकात १८ कर्तृत्ववान मान्यवरांचा जीवनपट व कार्य वाचकांसमोर मांडण्यात आला
त्यानंतर आता ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत अतुलनीय योगदान देणाऱ्या १८ कर्तृत्ववान मान्यवरांचा जीवनपट व कार्य वाचकांसमोर मांडण्यात आले आहे. राज्यभरातून सामाजिक भान जपणाऱ्या चांगल्या माणसांचा शोध घेऊन त्यांचा प्रामाणिक लेखाजोखा पुस्तकरूपाने मांडण्याचे कठीण आणि कष्टाचे काम लेखकाने केले आहे.
युवकांसाठी ठरेल प्रेरणादायी
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला पुस्तकात समाविष्ट असलेल्या अनेक मान्यवरांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. या पुस्तकामुळे कार्य करणाऱ्या ‘चमकणाऱ्या दिव्यांना’ अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळेल, तसेच समाजातील तरुण पिढीला त्यांच्या जीवनकार्यातून मोठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.
ज्येष्ठ कवी रूपचंद शिदोरे यांनी आपल्या मनोगतातून लेखक गोरक्षनाथ पवार यांच्या साहित्य प्रवासाचे कौतुक करत ‘चमकणारे दिवे (भाग २)’ या पुस्तकाच्या यशासाठी आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा दिल्या.








