राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लंडनचा यशस्वी दौरा आटोपून मुंबईत परतले. माञ आता त्या प्रवासातील एका प्रसंगाची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. तो प्रसंग म्हणजे मुंबईला येताना ब्रिटिश एअरवेजच्या विमानातच एकनाथ शिंदेंचा विसरलेला आयफोन. ते विमानतळावरून घरी पोहोचल्यानंतर मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास त्यांच्याजवळ मोबाईल नसल्याचे लक्षात आलं.
एकनाथ शिंदे त्यांचा मोबाईल फोन चक्क विमानात विसरले
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत लंडन दौऱ्यावर गेले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांना तीन पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात ब्रिटीश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस’मध्ये ‘कॉमनवेल्थ लिडरशीप रेकग्नेशन’, ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘स्टेटसमनशिप’ आणि महाराष्ट्र मंडळाच्यावतीने ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्कारांचा समावेश होता. या लंडन दौऱ्यावरून 12 सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे हे मुंबईत परतले. मात्र लंडन ते मुंबई असा प्रवास ज्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानातून त्या प्रवासादरम्यान एकनाथ शिंदे त्यांचा मोबाईल फोन चक्क विमानात विसरले. घरी आल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा फोन परत मिळवण्यासाठी यंत्रणांची धावाधाव सुरु झाली.
घरी पोहोचल्यानंतर पहाटे 3 वाजताच्या सुमारास मोबाईल नसल्याचं लक्षात आलं
एकनाथ शिंदे लंडन दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घरी पोहोचल्यानंतर पहाटे 3 वाजताच्या सुमारास मोबाईल नसल्याचे लक्षात आले. सुरक्षाव्यवस्थेतील पोलिसांनी तातडीने धावपळ केली. ब्रिटिश एअरवेजच्या विमानतळावरील सुरक्षा कार्यालयाशी संपर्क साधल्याचं म्हटलं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयातून मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे. यापूर्वीही मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा मोबाईल गहाळ झाला होता.
मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांची धावाधाव
माञ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोबाईल विमानात विसरल्याने यंत्रणांची धावाधाव झाली होती. विमानतळावरून निघाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पोलिसांना माहिती देण्यात आली. विमानतळावरील ब्रिटिश एअरवेजच्या सुरक्षा कार्यालयाशी पोलिसांनी संपर्क साधला. पहाटे 4 वाजता पोलिसांनी धावपळ करून शिंदे यांचा मोबाईल विमानातून शोधून आणला. यापूर्वीही शिंदे यांचा मोबाईल गहाळ झाल्याची घटना घडली अशी माहिती समोर आली होती. दरम्यान या मोबाईल गहाळच्या चर्चेवरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयातून मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
लंडनच्या रस्त्यावर वडापावचा आस्वाद
5 सप्टेंबरला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या खास सहकाऱ्यांसह आठवड्याच्या लंडनच्या दौऱ्यावर गेले होते.तसेच तेथील कार्यक्रमांमध्ये तीन पुरस्कार शिंदे यांना प्रदान करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमावेळी एकनाथ शिंदेंनी इंग्रजीमध्ये केलेलं भाषणही चांगलंच चर्चेत आलं आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत लंडनच्या रस्त्यावर वडापावचा आस्वाद घेतला होता त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.त्यानंतर एकनाथ शिंदे 12 सप्टेंबर रोजी मुंबईत परतले.








