सध्या महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा धाक फक्त हॉटेल व्यावसायिकांनाच नाही तर चक्क अभिनेत्यांनाही आहे. हे दिसून आलं एका शोमधून. नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये ‘दृश्यम 3’ च्या टीमने हजेरी लावली होती. अभिनेता अजय देवगण, जयदीप अहलावत आणि चित्रपटाच्या टीमसोबतचा हा खास एपिसोड चांगलाच चर्चेत आला आहे.
तुकाराम मुंढे यांचा उल्लेख अन् सर्वच कलाकाराच्या चेहऱ्याचे हावभाव बदलले
शोमध्ये नेहमीप्रमाणे कलाकारांनी धमाल-मस्ती केली. मात्र यावेळी तुकाराम मुंढेंचा उल्लेख झाल्यानंतर अजय देवगणची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. शोमध्ये तुकाराम मुंढे यांचे नाव विनोदी पद्धतीने घेण्यात आलं. शोमध्ये अभिनेता किकू शारदा महिलेच्या वेशात दिसत होता. यावेळी त्याने जयदीप अहलावतसमोर तुकाराम मुंढे यांचा उल्लेख केला. तुकाराम मुंढे सध्या इथे-तिथे फिरत असून, ते कधीही येऊन छापा टाकू शकतात, असा विनोदी संवाद किकूने केला. त्यावर कृष्णा अभिषेकनेही आपल्या खास अंदाजात त्याची फिरकी घेतली.
कलाकारांमध्ये एकच हशा पिकला
कृष्णा अभिषेकने किकूला, ‘तू काय नाश्त्यामध्ये गाढव खाऊन आलीस का?’ असा मिश्कील सवाल केला. त्यानंतर भेसळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाते असं म्हणत त्याने पुढचा डायलॉग मारला. पण हा डायलॉग ऐकताच जयदीप अहलावतसह सेटवरील सर्व कलाकारांमध्ये एकच हशा पिकला.
View this post on Instagram
तुकाराम मुंढेंचं नाव ऐकताच अजयने चेहरा लपवला
या संपूर्ण प्रसंगात मात्र अजय देवगणच्या चेहऱ्यावरील भावांनी विशेष होते. किकू आणि कृष्णाच्या संवादानंतर अजयने अक्षरशः चेहऱ्यावर हात ठेवत लाजत हसण्याची प्रतिक्रिया दिली. त्याची ही प्रतिक्रिया पाहून शोमधील सर्वजण आणखीणच त्याची मजा घेऊ लागले. सोशल मीडियावरही अजयच्या या रिॲक्शनची चर्चा होत आहे.
‘विमल’च्या जाहिराती संदर्भात अजयला आलेली नोटीस
तुकाराम मुंढे यांचा उल्लेख होताच अजय देवगणची प्रतिक्रिया चर्चेत येण्यामागे आणखी एक कारण आहे. यापूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाशी संबंधित एका प्रकरणात तुकाराम मुंढे यांनी ‘विमल’च्या जाहिरातीच्या संदर्भात अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना नोटीस पाठवली होती. त्यामुळे कपीलच्या शोमध्ये तुकाराम मुंढेंचा विनोदी उल्लेख होताच अजयची प्रतिक्रिया पाहून चाहत्यांना त्या प्रकरणाची आठवण झाली.








