सरपंच निवडणुकीबाबत सध्या २ नियम बदलल्याची चर्चा सर्वञ होताना दिसत आहे. ते कोणते आणि त्यात खरंच काही तत्थ्य आहे का हे जाणून घेऊयात.पहिली चर्चा म्हणजे सरपंचांना प्रचारासाठी फक्त १ दिवस मिळणार आहे, सोशल मीडिया व्हायरल होत असलेल्या व्हिडीओनुसार आणि काही बातम्यांनुसार हा सरपंच निवडणुकीत मोठा बदल असल्याचा दावा केला जात आहे. पण महाराष्ट्रात असा कोणताही १ दिवसाच्या प्रचाराचा नियम लागू झालेला नाही. हा नियम महाराष्ट्रासाठी नसून राजस्थानमधील आगामी पंचायत निवडणुकीशी संबंधित आहे.
महाराष्ट्रात उमेदवारांच्या प्रचाराची काय स्थिती?
राजस्थानमध्ये २०२६ मधील आगामी सरपंच निवडणुकीसाठी एक विशेष प्रक्रिया राबवली जात आहे. तेथे उमेदवारांना निवडणूक चिन्ह (सिंबॉल) वाटप झाल्यानंतर, थेट त्याच्या पुढच्याच दिवशी मतदान होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी प्रत्यक्षात फक्त एकच दिवस किंवा एक रात्र मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशी कोणतीही घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केलेली नसून. महाराष्ट्रात निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर उमेदवारांना प्रचार करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाणार आहे.
थेट जनतेतून सरपंच निवड रद्द होणार ,निवडणुकीतील दुसरा बदल
सरपंच निवडणुकीबाबत दुसऱ्या एका बदलाची होत असलेली चर्चा म्हणजे आता सरपंचांची निवड थेट जनतेतून न होता,निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून केली जाणार.ही बातमी देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माञ ही बातमी अफवा असून, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्यानुसार, सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याची तरतूद सध्या कायदेशीररीत्या लागू आहे.राज्य सरकार किंवा राज्य निवडणूक आयोगाकडून थेट सरपंच निवड रद्द करण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय किंवा शासन निर्णय घेण्यात आलेला नाही.
खात्रीशीर माहितीसाठी महाराष्ट्र शासन किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही खात्रीशीर माहितीसाठी महाराष्ट्र शासन किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊनच बातमीची खाञी करून घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.








